![]() |
शिवलिंग, चामर लेणी |
आजच्या घडीला नामांतराचे वारे सर्वत्र घुमू लागले आहे. इलाहाबादचे 'प्रयागराज' तर फैजाबादचे 'अयोध्या' झालेले आहे. हे वारे महाराष्ट्रातही पोहोचले आहे. नामांतर करणे योग्य की अयोग्य अशा चर्चांना उत आलेला आहे. इतिहासात होऊन गेलेल्या चुकांचा पाढाच वाचला जात आहे. ते एका अर्थाने योग्य आहे, कारण जो देश स्वतःचा उज्ज्वल इतिहास विसरतो, तो प्रगती करू शकत नाही. नाव बदलून विकास साधता येत नसला तरी स्थानिक लोकांची अस्मिता जागी होऊन सांस्कृतिक गुलामी संपवता येऊ शकते. अशाने जनभावनेचे मनोधैर्य नक्कीच वाढण्यास मदत होईल. परंतु कुठल्याही ठिकाणाचे नामांतर करण्यापूर्वी त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी तपासणे आगत्याचे आहे.
औरंगाबादचे
‘संभाजीनगर’ व अहमदनगरचे ‘अंबिकानगर’ करावे का? किंवा करू नये अशा चर्चांच्या
उधाणात उस्मानाबादचे ‘धाराशिव’ का व्हावे ? याविषयी म्हणावी तसी चर्चा होताना दिसत
नाही. खरे तर महाराष्ट्रातील इतर ठिकाणांच्या अगोदर उस्मानाबादचे नाव 'धाराशिव' व्हायला हवे. तेव्हाच मराठवाडा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्रसैनिकांना खरी
श्रद्धांजली वाहता येईल. सर्वप्रथम धाराशिव आणि उस्मानाबाद ही नावे कशी? व केव्हा? प्रचारात आली, या मागची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहूयात.
संपूर्ण
उस्मानाबद जिल्ह्याला सध्याच्या ज्या उस्मानाबादमुळे ‘उस्मानाबाद जिल्हा’ हे नाव
प्राप्त झाले, त्याचे पूर्वीचे नाव ‘धाराशिव’ होते, हे सर्वांना माहित आहे. या
ठिकाणाला 'धाराशिव' नाव असण्याचा सर्वांत प्राचीन व अस्सल पुरावा तब्बल बाराशे
वर्षांपूर्वी इ. स. ८०७, ८१० व ८१२ या वर्षांतील राष्ट्रकूटकालीन ताम्रपटांत
पाहायला मिळतो. यापूर्वीही सु. सहाव्या शतकात येथील परिसरात जैन व हिंदू लेणी
खोदली गेली होती. म्हणजेच आजपासून किमान पंधराशे वर्षांपूर्वीही धाराशिव हेच
नाव प्रचारात असावे, हे सहजच लक्षात येते.
धाराशिव हे नाव या ठिकाणाला कसे प्राप्त झाले, यांविषयी अनेक मत-मतांतरे आहेत. एका मतानुसार ‘धारा’ आणि ‘शिव’ नावाच्या राजांमुळे हे नाव रूढ झाले असावे. तसेच 'धाराशिव' या नावाला दोन स्थानिक भिल्ल कारणीभूत असल्याचेही सांगितले जाते. एका अन्य मतानुसार शहराच्या जवळच खोदल्या गेलेल्या चांभार लेणीतील सु. सहाव्या शतकातील 'शिव' (शिवलिंग) व लेण्यांजवळून वाहणाऱ्या भोगावतीच्या जल’धारा’ यामुळे 'धाराशिव' हे नाव प्राप्त झाले असावे. अन्य एक मत म्हणजे धारासूरमर्दिनीचे मंदिर होय. धारासूरमर्दिनी या शब्दातील ‘धारा’ व चांभार लेणीतील ‘शिव’ मिळून धाराशिव झाले असावे. परंतु या मतांविषयी एकवाक्यता दिसून येत नाही.
धाराशिव नावाचा उल्लेख अपभ्रंश भाषेतील ‘करकण्डचरिउ’ (११ वे शतक) व संस्कृतमधील ‘बृहत्कथाकोश’ (इ. स. ९३१-३२) या ग्रंथांतही सापडतो. यानंतर चौदाव्या शतकात बहमनी सत्तेची पाळेमुळे या ठिकाणी घट्ट बसली. चौदाव्या शतकात ख्वाजा शमसुद्दीन दर्गा बांधला गेला. परंतु याही काळात धाराशिव हेच नाव प्रचारात होते. मुस्लिम शासक असले तरी त्यांनी जनतेच्या भाव-भावनांचा आदरच राखला. नामांतराचा कुणी विचारही केला नाही. त्यानंतर शिवकाळात या भागावर आदिलशाही व निजामशाही ही घराणी राज्य करीत होती (सु. १५ ते १७ वे शतक). त्यानंतर मोगलांकडे हा प्रदेश आला. औरंगजेबाचे वास्तव्य काही काळ तुळजापूर या ठिकाणी होते. म्हणजेच तोही जनभावनांच्या विरुद्ध जाऊ शकला नाही. यावेळीही धाराशिव नाव प्रचारात होते.
मोगल सत्ता कमजोर झाल्यानंतर निजाम-उल-मुल्क (मीर कमरुद्दीन खान) या मोगल सरदाराने हैद्राबादला आपली राजधानी बनवून इ.स. १७२४ साली निजाम राज्याची स्थापना केली. धाराशिवसह मराठवाडा निजाम राज्यात राहिले. तेथून पुढे सु. १८७ वर्षे इतर निजाम शासकांनी राज्य केले. म्हणजेच या निजामांच्या काळातही अगदी १९११ पर्यंत ‘धाराशिव’ हेच नाव प्रचलित होते. कागदोपत्रीही असाच उल्लेख मिळतो. ही ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहता धाराशिव हे नाव येथील लोकांची ओळख बनले होते, असे दिसून येते. हिंदू-मुस्लिमांच्या कित्येक पिढ्यांना हेच नाव माहित होते. यावरून धाराशिव हे मूळ नाव या भागातील लोकांसाठी अस्मितेचा मुद्दा आहे, हे सहज कळून येते.
आता उस्मानाबाद नावाची पार्श्वभूमी पाहूयात. इ. स. १८६१ साली 'नळदुर्ग' हे जिल्हा केंद्र बदलून ते धाराशिवला आणण्यात आले. इ .स. १९११ साली उस्मान अलीने आपल्या राज्यरोहनाचे औचित्य साधून धाराशिव हे मूळ नाव बदलून उस्मानाबाद असे केले. परंतु हे नाव लोकांच्या पचनी कधी पडलेच नाही. व या नावाचा विरोध हा वाढतच राहिला. आजही जुन्यापिढीतील लोक उस्मानाबाद ऐवजी 'धाराशिव' हेच नाव मुखात घेतात. ते इतके तोंडवळणी पडले की आजही ते लोकांच्या मनात घर करून राहिले आहे.
यानंतरचा बराचसा इतिहास आपणास माहित आहे. भारतात स्वातंत्र्य चळवळ धगधगत होती. मराठवाडयातील जनतेलाही जुलमी निजामांकडून स्वातंत्र्य हवे होते. अनेक आंदोलने व छुट-पुट लढाया सुरु होत्या. मुहम्मद अली जिनांनी पाकिस्तानचे बिगुल वाजविलेच होते. जनक्षोभ वाढत होता. पुढे १९४७ साली भारत स्वतंत्र झाला. मराठवाडयातील जनताही निजामांचा प्रतिकार करू लागली. परंतु जनभावनांचा आदर करेल तो उस्मान अली कसला. जनक्षोभ तीव्र झाल्याचे कळताच रझाकाररुपी छळ सुरु झाले. जनता यात पार होरपळून गेली. जनतेचे आतोनात हाल होऊ लागले. निजामी अत्याचाराचा पूर आला. या सर्व गोष्टींना उस्मान अली जबाबदार होता, ज्याचे नाव धाराशिव शहराला दिले गेले होते.
आजच्या पिढीतील पूर्वजांवर उस्मान अलीमुळे अत्याचार झाले. कित्येकांच्या कत्तली झाल्या. अशा या उस्मान अलीचे नाव, ज्याचा आम्हा धाराशिवकरांशी काडीचाही संबंध नाही, जो पाकिस्तानशी हातमिळवणी करू इच्छित होता, तसेच जनभावनेच्या विरुद्ध जाऊन तो स्वतंत्र राष्ट्र उभारू इच्छित होता. ज्यासाठी तत्कालीन कॉंग्रेस व भारताचे गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांना पोलीस कार्यवाही करून धाराशिवसह मराठवाडा मुक्त करून घ्यावा लागला. ज्या निजाम राज्यात महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर इ. सारख्या नेत्यांना सहजासहजी सभा घेण्यास परवानगी मिळत नसे. या सर्व गोष्टींना कारणीभूत होता तो उस्मान अली. या उस्मान अलीचे नाव या जिल्ह्याला असणे म्हणजेच असंख्य हुतात्म्यांचा, देशभक्तांचा व भारतमातेचा अपमान नाही का? हा आपल्या तमाम पूर्वजांचा अपमान नाही का? मराठवाडा मुक्तीसाठी हुतात्म्यांनी रक्त सांडले नसते तर आजचे सरकार तरी येथे असते का? या सर्व गोष्टींचा विचार महाराष्ट्र सरकारने करायला हवा.
इतर नामांतरे योग्य की अयोग्य याविषयी आम्ही धाराशिवकर सध्यातरी बोलू इच्छित नाही. परंतु उस्मानाबादचे धाराशिव हे नाव असणे किती योग्य आहे, हे या नावामागच्या इतिहासावरून कळून येते. त्यामुळे 'धाराशिव' या नावाला विरोध न करता व राजकारणाला बळी न पडता, कायदेशीररित्या एकमताने सध्याचे उस्मानाबाद हे नाव बदलून ‘धाराशिव’ हे नाव व्हायला हवे. तेव्हाच मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांस खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहिली जाईल.
धाराशिव लेणी |
छान सांगितलय इतिहास
उत्तर द्याहटवाखूप छान..!
उत्तर द्याहटवासंग्रही ठेवावा असा अभ्यासपूर्ण लेख..!
धन्यवाद 🙏
उत्तर द्याहटवा