गुरुवार, २ फेब्रुवारी, २०२३

पारगाव (सालू-मालू) येथील मुहम्मद तुघलकाचा मराठी शिलालेख (गधेगळ) व महादेव मंदिर (Pargaon Salu-Malu Inscription of Muhammad Tughalaq and Mahadev temple )


तेराव्या शतकाच्या शेवटी आणि चौदाव्या शतकाच्या प्रारंभी दक्खन म्हणजेच आपल्या महाराष्ट्रासह दक्षिण भारताच्या इतिहासात खूप मोठ्या घडामोडी घडून आल्या. देवगिरीचे यादव, वारंगळचे काकतीय, द्वारसमुद्राचे होयसळ व दक्षिणेतील इतर राज्यांना परकीय आक्रमणांच्या तीव्र झळा पोहोचल्या. हळूहळू दक्षिणेमध्ये इस्लाम राज्यकर्त्यांचा शिरकाव सुरु झाला. या सुमारास दक्खनच्या उत्तरभागावर (विशेषतः सध्याच्या महाराष्ट्रावर) यादव नृपती रामचंद्र किंवा रामदेव याचे राज्य होते. सर्व काही सुरुळीत चालत असताना उत्तर भारतात स्थिरावलेल्या अल्लाउद्दिन खिलजीने आपले साम्राज्य विस्ताराचे धोरण आखले. मलिक काफूरच्या नेतृत्त्वात दक्खनवर अनेक आक्रमणे होऊ लागली. इ.स. १२९६ साली यादव साम्राज्याची राजधानी असलेल्या देवगिरीवर अल्लाउद्दिनने आक्रमण करून मोठ्या प्रमाणात धन-दौलत लुटली. देवगिरीतून प्राप्त झालेल्या अपार संपत्तीमुळे त्याची धन-प्राप्तीची लालसा अजून प्रबळ झाली. इ.स. १३१७ पर्यंत देवगिरी पूर्णपणे खिलजी साम्राज्यात म्हणजेच दिल्ली सल्तनतमध्ये विलीन झाले. परंतु खिलजीचे हे वर्चस्व जास्त काळ टिकू शकले नाही. त्याच्या मृत्युनंतर इ.स. १३२१ साली दिल्लीच्या गादीवर आलेल्या घियासुद्दिन तुघलकाने आपला पुत्र उलुघ खान (मुहम्मद बिन तुघलक) याला दक्षिणेतील वारंगळ व जाजनगरच्या विजयासाठी पाठविले (Mahdi,१९३८:५६). त्याने अल्पावधीतच काकतीय, होयसळ व पांड्य राज्यांवर नियंत्रण प्रस्थापित केले. दक्षिण भारतावर आपली प्रभावी पकड निर्माण करण्यासाठी त्याने इ.स. १२२७ साली दिल्लीऐवजी देवगिरीला आपली राजधानी बनविले. तसेच देवगिरीचे नाव बदलून ‘दौलताबाद ठेवण्यात आले. परंतु तुघलकांना अनेक स्थानिक विद्रोह व अशांतीला तोंड द्यावे लागले. परिणामस्वरूप लवकरच तुघलकी साम्राज्य संपुष्टात आले. यानंतर दक्षिणेत विजयनगर (इ.स. १३३६) व बहामनी (इ.स. १३४७) साम्राज्यांची स्थापना झाली. या संक्षिप्त ऐतिहासिक पार्श्वभूमिनंतर आपण पारगाव सालू-मालू येथील महादेव मंदिर व तेथील शिलालेखांवर प्रकाश टाकू.

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात पारगाव (सालू-मालू) येथे महादेवाचे एक सुंदर मंदिर आहे. मंदिराच्या मागे काही अंतरावरून भिमा नदी वाहते. या मंदिराजवळच तुकाईचे एक अन्य मंदिरदेखील आहे. पुणे-सोलापूर महामार्गाने किंवा वाघोली-दौंड राज्यमार्गाने येथे पोहोचता येते. पुणे येथून पारगाव हे सु. ६२ किमी अंतरावर आहे. गावात काही पुरातन मंदिरांचे अवशेष, वीरगळ, गधेगाळ, समाध्या, दर्गा व अन्य काही अवशेष पहावयास मिळतात. संत तुकारामांच्या काळातील सालू-मालू हे मूळतः या गावातील रहिवाशी असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या गावाच्या नावामागे ‘सालू-मालू हे नाव जोडले गेले. ब्रिटीशकाळात येथे मोठ्या प्रमाणावर बंड झाले होते. म्हणून या गावास ‘बंडाचे पारगाव’ या नावानेही ओळखले जाते. गावाजवळ असणाऱ्या भिमा नदीवर ‘नावघाट’ म्हणून एक ठिकाण आहे, तेथे पूर्वी एका किनाऱ्याहून दुसरीकडे जाण्यासाठी नावांच्या फेऱ्या होत असत.


महादेव मंदिर

महादेवाचे मंदिर पुर्वाभिमुख असून त्रिदल पद्धतीचे आहे. मंदिराला सु. २ मीटर उंचीची प्राकारभिंत आहे. मंदिराच्या आवारात प्रवेश करण्यासाठी प्राकारभिंतीला दक्षिणेकडून एक पायऱ्या असणारा मार्ग आहे. प्रवेशमार्गावर काही अक्षरे कोरली आहेत. परंतु ती खूपच अस्पष्ट असल्याने अवाचनीय आहेत. प्राकारभिंतीवर चढण्यासाठी काही ठिकाणी पायऱ्यांची सोय केलेली आहे. प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर समोर पूर्णतः पडून गेलेल्या नंदीमंडपाचा थोडासा उंच भाग दिसतो. मूळ नंदीप्रतिमा काढून त्याजागी नवीन नंदी बसविण्यात आलेला आहे. संभवतः मंदिर एका अधिष्ठानावर उभे असावे, परंतु मातीचा थर वाढल्याने ते बुजून गेले आहे. सभामंडपाच्या बाहेर दोन्ही बाजूंना दोन कोनाडे आहेत. तर सभामंडपात प्रकाश यावा म्हणून, प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना पानांच्या आकाराचे नक्षीकाम असलेली विशिष्ठ प्रकारची जालवातायने (गवाक्ष) तयार करण्यात आली आहेत. सभामंडपाचे द्वार साधारण असून ते नंतर कधीतरी बदलले असावे, असे दिसते. कारण मूळ द्वाराचा काही भाग (निधी व द्वारपाल) शिलालेखांच्या बाजूंना मंदिराबाहेर ठेवलेला दिसतो. तसेच मंदिरासमोर काही खंडित शिल्पे आजही दिसतात. याचा अर्थ मूळ मंदिराचा काही भाग कधीतरी काढला गेला असावा. सभामंडपाच्या प्रवेशद्वारावर गणेशशिल्प आहे. सभामंडपात प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना दोन-दोन अर्धस्तंभ असलेली कक्षासने आहेत. सभामंडपाच्या आतील भागाची लांबी ५९० सेमी असून रुंदी ६५५ सेमी आहे. तसेच चतुष्कीच्यामधील रंगशिलेचा भाग ३२७ सेमी लांब व ३४५ सेमी रुंद आहे. सभामंडपात चार मुख्य स्तंभ (चतुष्की) तर १२ अर्धस्तंभ आहेत. स्तंभांची उंची (स्तंभशीर्षांपासून) २४५ सेमी आहे. सभामंडपात एका भिंतीवर एका व्यक्तीने स्वतःचे शिश्न स्वतःच्या तोंडात घेतल्याचे   अंकन आहे. सभामंडपात डाव्या व उजव्या बाजूंना दोन उपगर्भगृहे आहेत. यांची द्वारेही तीन शाखांची आहेत. त्याखाली निधी, द्वारपाल व गंगा-यमुना अंकित केल्या आहेत. उपगर्भगृहांत सध्या मुर्तीविरहित पादपीठे दिसून येतात. उजवीकडील उपगर्भगृहाची लांबी ३२० सेमी असून रुंदी २२० सेमी आहे. डावीकडील उपगर्भगृहाचा आकारही सर्वसाधारणपणे असाच असावा. या गर्भगृहांत जाण्यासाठी पायऱ्यांची सोय दिसत नाही. अंतराळाच्या बाजूला दोन रिकामी देवकोष्ठे आहेत. मंदिराच्या अंतराळाची लांबी २५० सेमी असून रुंदी २७५ सेमी आहे. अंतराळाच्या दर्शनी भागात दोन स्तंभ टेकू म्हणून उपयोगात आणले आहेत. त्यांवर तुळईंचा भाग तोलला गेला आहे. अंतराळात दोन्ही बाजूंना दोन रिकामी देवकोष्ठे आहेत. यानंतर मुख्य गर्भगृहाचे प्रवेशद्वार लागते, ते त्रिशाखांचे आहे. हे प्रवेशद्वारही इतर उपगर्भगृहांच्या द्वाराप्रमाणेच आहे. ललाटपट्टीवर गणेशशिल्प आहे. यानंतर आपण गर्भगृहात पोहोचतो.

गर्भगृहाची लांबी व रुंदी २७२ सेमी असून मध्यभागी शिवलिंग आहे. शिवलिंगाच्या पाठीमागे एक देवकोष्ठ आहे. त्यात बहुदा पार्वतीचे शिल्प असावे. अभिषेकासाठी पाणी एकत्रित करण्यासाठी एक मोठे पात्र गर्भगृहात ठेवले आहे. मंदिरातील सर्व विताने समतल प्रकारची आहेत.

महादेव मंदिर, पारगाव सालू-मालू

महादेव मंदिराच्या बाह्यांगावर विशेष नक्षीकाम नाही. परंतु सभामंडपाच्या उजव्या कोनाड्यावर दोन ओळींत काही अक्षरे कोरली आहेत. त्यांपैकी पहिल्या ओळींत ‘श्री विठल देव व खाली इतर अक्षरे दिसतात. उजव्या बाजूकडील उपगर्भगृहाच्या बाह्यभिंतीवर काही रेखाटने आहेत. त्यांमध्ये एक लज्जागौरीप्रमाणे एक स्त्री अंकित आहे. एका दुसऱ्या अंकनात एका व्यक्तीने आपले लिंग व अंडकोष यांना एका दोरीने बांधून त्याचा भार खांद्यावर तोलला आहे. तर त्यापुढील एका रेखांकनात एक स्त्री व दोन पुरुष यांच्या समागमाचे दृश्य आहे.

मंदिराच्या शिखराच्या उर्वरित भागावरून ते भूमिज शैलीतील आहे, हे सहज लक्षात येते. शिखरावर एकावर एक असे पाच कूटस्तंभ असावेत. कूटस्तंभांची सर्वांत वरची एक ओळ पडून गेली आहे. शिखर पंचभौम प्रकारातील आहे. शिखरावरील मूलमंजरी व शूरसेनकाचा भाग दिसतो. आमलक व कलशाचा भाग नष्ट झालेला आहे. एवढेच नाही तर या शिखराचा उत्तरेकडील भाग सोडल्यास इतर सर्व भाग पडून गेलेला आहे. अंतराळावरती शुकनासिका आहे. परंतु तिचाही दक्षिणेकडील भाग मोठ्या प्रमाणात पडून गेला आहे. उपगर्भगृहे व सभामंडपावर नंतर बनवलेली प्रतीकात्मक शिखरे दिसतात. मंदिराच्या दक्षिणेकडे गर्भगृहाबाहेर अभिषेकासाठीचे जल ओतण्यासाठी अभिषेकपात्र आहे, तर दक्षिणेकडे गर्भगृहातील पाणी बाहेर काढण्यासाठी प्रणालक आहे. मंदिराच्या डाव्या बाजूला एक छोटीशी वास्तू आहे. तिच्या रचनेवरून ती महादेव मंदिराच्या समकालीन वाटते. मातीच्या थरामुळे ती काही अंशी जमिनीत गाडली गेली आहे. ही वास्तू बहुदा एखाद्या थोर व्यक्तीची समाधीही असू शकते. मंदिरासमोर गणेशाच्या दोन, विष्णू, देवी व राशीचक्र पाहावयास मिळते. राशीचक्र विशेष असून त्याची रचना एका मंडलाप्रमाणे आहे. यावर पशु, पक्षी, मनुष्य यांची छोटी-छोटी शिल्पे चारी बाजूंनी कोरण्यात आली आहेत. याशिवाय एका कोनाड्यात एका शिळेवर पद्मासनात बसलेला योगी कोरला आहे.


शिलालेख क्र. १ (१८.५६३१७१, ७४.३७३५३६)

वर्णन:

महादेव मंदिराच्या आवारात लेख असलेल्या दोन शिळा ठेवल्या आहेत. या शिळांवर गाढव व स्त्री यांचे अंकन असल्याने यांना ‘गधेगाळ असेही म्हटले जाते. या दोन शिलालेखांपैकी उजवीकडील लेख हा मुहम्मद तुघलकाच्या काळातील आहे. सदर शिळा ९८ सेमी उंच असून ३१.५ सेमी रुंद आहे. लेख एकूण १३ ओळींचा आहे. लेखाच्या वरती उजव्या बाजूला चंद्र व डाव्या बाजूला सूर्य कोरले आहेत. लेख संपल्यानंतर खाली गाढव व स्त्री हे समागम करत असतानाचे अंकन आहे. लेखाच्या मध्यभागातील बराचसा भाग ऊन, वारा, पाऊस व मानवी हस्तक्षेपामुळे वाचनास कठीण होऊन बसला आहे. सदर लेख वाचण्याचा काटेकोरपणे प्रयत्न केलेला आहे, तरीही खडबडीत भागावरील लेखन वाचनात काही त्रुटी येऊ शकतात.

शिलालेखाचा पाठ:

१.      स्वस्ति श्री सके १२५१ वीभव

२.      सेवंचरे श्रुताण माहामु-

३.      ददेवै नायकं स्रव अधी-

४.      कर(री) परगै(णै)]सी सेवलीतच

५.      मदेऊ [द्वा]परे स्मस्तीपतीं

६.      सोमन(र)सु अेकक्षु(रू) गुरो मालि

७.      तेली सीपा सोनारू हेय अक-

८.      र पाचै पाढैल ***म लदे-

९.      ऊ ऐआंकु[कृ] * धर्मु **दे वेधे ना-

१०.  याक देवाची [ही] पर्वडी पाली ते-

११.  अचा धर्मु न पली

१२.  तेअचीऐ मऐ ग-

१३.  धो

संक्षिप्त अर्थ: “स्वस्ति श्री सके १२५१ विभव संवत्सरात सर्व अधिकार असलेला सुलतान माहमूद याने (कर) लावला आहे. हा कर बहुदा त्याने गुरव, माळी, तेली, शिंपी व सोनार यांना लावला आहे. नायक देव (मुहम्मद बिन तुघलक) याने लावून दिलेली ही व्यवस्था (परवडी) पाळेल तो धर्माप्रमाणे आचरण करत आहे, असे समजावे. जर कोणी या व्यवस्थेचे पालन करीत नसेल तर त्याच्या आईला गाढव लागेल, असा शेवटी शिवीवजा शाप दिलेला आहे.

शिलालेख क्र.१. मुहम्मद बिन तुघलाकाचा शिलालेख

अक्षरवटिका, लेखनपद्धति, भाषा व काळ

लेख देवनागरी लिपीत असून मराठी भाषेत आहे. लेखावर यादवकालीन लेखनशैलीच्या वळणाचा प्रभाव आहे. लेख ज्या शिळेवर कोरला आहे ती शिळा सुरुवातीला घासून गुळगुळीत केलेली दिसते. लेखातील अक्षरे काहीशी लहान असली तरी स्पष्टपणे कोरण्यात आल्याचे दिसून येते. लेखातील काही शब्द हे अशुद्ध लिहिले गेले आहेत. काही अक्षरांवर अनुस्वार आहेत.

प्रस्तुत लेखाच्या प्रारंभी ‘स्वस्ति श्री शके १२५१ विभव संवत्सरे’ असा स्पष्ट कालोल्लेख आहे. परंतु काल्लोलेखात महिना, तिथी, वार यांचा उल्लेख केलेला नाही. पिल्ले जंत्रीप्रमाणे वरील कालगणना इंग्रजीत जानेवारी ते मार्च या महिन्यांत इ.स. १३२९ अशी येते. या कालखंडात माघ, फाल्गुन व चैत्र हे भारतीय महिने येतात.


शिलालेख क्र. २.

हा गधेगाळ वरील शिलालेखाच्या उजव्या बाजूला उभा ठेवला आहे. याची उंची ९८ सेमी व रुंदी ३० सेमी आहे. लेखाच्या शिळेवरती कलशाप्रमाणे रचना आहे. त्याखाली चंद्र व सूर्य कोरले आहेत. त्यानंतर देवनागरी लिपीत व मराठी भाषेत पाच ओळी कोरल्या आहेत. सर्वांत खाली गाढव व स्त्री यांच्या समागमाचे अंकन आहे. लेख स्पष्ट असला तरी खालील काही भाग ओबड-धोबड आहे. लेखाचा संपूर्ण अर्थ लागत नाही. सध्या या लेखाची येथे केवळ नोंद घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ज्या शब्दांची व अक्षरांची व्यवस्थित ओळख पटलेली आहे, ती खाली दिलेली आहे. सदर लेखातील अक्षरे ही यादवकाळाला जवळची आहेत. अक्षरांचे एकूण वळण पाहता, हा लेख पहिल्या लेखाच्या समकालीन वाटतो. लेखातील अंतिम शब्द ‘रेऐलें’ असा आहे. या शब्दाचा अर्थ ‘रचणे किंवा बांधणे असा होतो. त्यामुळे लेखात एखादी वास्तू बांधण्याचा उल्लेख असावा, असे दिसते.


शिलालेखाचा पाठ:

१. प्रस्वम [?] प्य मा क * I

२. * कि व[१?] * * I

३. धजे देवाची ऐक I

४. वरावाटे [मावटे] साकाभ I

५. रेऐलें II

शिलालेख (गधेगळ) क्र.२.

निष्कर्ष

वरील सर्व विवरणावरून असे लक्षात येते की दक्खनमध्ये व दक्षिण भारताच्या इतर भागांवर यादव, काकतीय, होयसळ, पांड्य यांच्या काळात निर्माण झालेली स्थापत्य शास्त्रीय व सांस्कृतिक बैठक दिल्ली येथून आलेल्या सुलतानांना एकदम मोडता आली नाही. दक्खनमध्ये या राज्यकर्त्यांना साम्राज्याची घडी बसविण्यासाठी यादव काळात प्रबळ असलेल्या स्थानिक हिंदू नायक व व्यक्तींना विश्वासात घेणे अत्यंत आवश्यक होते. बहुसंख्यक हिंदू जनतेला अजूनही तुघलकी पद्धतिची पूर्ण माहिती नव्हती. त्यामुळे हिंदूंना काही प्रमाणात का होईना धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रांत सवलती प्राप्त होत्या/द्याव्या लागल्या, असे दिसते. पुढे चौदाव्या-पंधराव्या शतकातही मराठी भाषेचा उपयोग हा सुरूच होता, हे महाराष्ट्रात आढळलेल्या अन्य अनेक मराठी शिलालेखांवरून स्पष्ट होते.

उपलब्ध झालेल्या शिलालेखांमध्ये मंदिराविषयीचा थेट उल्लेख आढळून येत नाही. परंतु मंदिराच्या कला-स्थापत्यावरून शिलालेख व मंदिर समकालीन असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मंदिराच्या शिखरावर काही अंशी इस्लामिक स्थापत्यात असणारी कमानीदार वास्तू-प्रकार आढळून येतो. यावरून हेही स्पष्ट होते की या काळात मंदिर निर्माण कार्य एकदम बंद पडू शकले नाही. ते पुढे बहामनी काळातही सुरूच होते. हे या काळातील प्राप्त झालेल्या या व अन्य अनेक मंदिरांवरूनही लक्षात येते. याचे पारगाव सालू-मालू येथील महादेव मंदिर एक उत्तम उदाहरण म्हणता येईल. १३व्या शतकातील मूर्तीकला व तिची विषयवस्तू १४व्या शतकातही सुरु असलेली दिसते. महादेव मंदिराच्या भिंतींवर अंकित केलेल्या प्रतिमांवरून हे कळून येते. परंतु या काळातील मंदिरांवर पूर्वीसारखे मोठ्या प्रमाणावर असलेले अलंकरण मात्र दिसत नाही.

महादेव मंदिराच्या आवारात प्राप्त झालेला मुहम्मद बिन तुघलकाच्या काळातील शिलालेख दक्खनमधील समाजिक व सांस्कृतिक परिस्थिती समजण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. मुहम्मद बिन तुघलकाचे नाव असलेला हा महाराष्ट्रातील पहिलाच शिलालेख आहे, हे विशेष. मुहम्मद या शब्दामागील ‘देव’ हे प्रत्यय नाविन्यपूर्ण आहे. या लेखात सुलतान मुहम्मद तुघलक याचा राज्यकर्ता म्हणून उल्लेख आहे. तसेच हा लेख जेव्हा देवगिरी ही संपूर्ण भारताची राजधानी होती, त्या कालखंडात कोरला असल्याने ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाचा आहे. इ.स. १३२७ ते १३३५ पर्यंत देवगिरी ही तुघलक साम्राज्याची राजधानी राहिली. या लेखावरून तुघलकाने आपली प्रशासनावरील पकड कशाप्रकारे मजबूत करण्याचा प्रयत्न केला होता, हे दिसून येते.

भाषिकदृष्ट्या फारशी शब्दांचा प्रभाव या लेखावर दिसत नाही. बहुतेक शब्द हे त्यापूर्वी प्रचलित असलेल्या मराठी भाषेतील आहेत. सुलतान या शब्दाचे ‘श्रुताण’ हे रूप नाविन्यपूर्ण आहे. तसेच या लेखात परवडी, स्रव, नायक इ. पारंपारिक शब्दावलीचा उपयोग आढळून येतो.


विशेष आभार: शिलालेखातील काही अक्षरे व शब्द यांचा छडा लावण्याकामी श्री. कृष्णा गुडदे यांचे सहकार्य मला प्राप्त झाले. डॉ. शिवाजी वाघमोडे व श्री. अनिल दुधाने यांचे मार्गदर्शनही मला मिळाले. मी या सर्वांचा अत्यंत ऋणी आहे.


संदर्भ

१.      Husain, Agha Mahdi, The Rise and Fall of Muhammad Bin Tughluq, London, Luzac and Co. 1938.

२.      तुळपुळे, शं. गो. प्राचीन मराठी कोरीव लेख

३.      Pillai, S. An Indian Ephemeris,Vol. IV, 1922: 260.


-    डॉ. विजय सरडे

(७५०७६३२३१२, e-mail:vijaysarde@gmail.com)


(टीप: सदर लेखात पारगाव सलू-मालू येथील नवउपलब्ध शिलालेखावर विशेष प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या प्राथमिक लेखात बऱ्याच अंशी शिलालेख क्र. १ वाचून त्याचे विश्लेषण करण्याचा शक्य तितका प्रयत्न केला गेला आहे. लवकरच येथील संपूर्ण शिलालेख (अवाचानीय अक्षरे व शब्द) व याला चिटकून येणाऱ्या सर्व गोष्टींचा उलगडा करण्याचा प्रयत्न अजून एका स्वतंत्र लेखात केला जाईल.)

 







३ टिप्पण्या:

  1. अभ्यासपूर्ण लेख आणि माहिती नव्यान मांडली याचा उपयोग अभ्यासकासाठी होईल .आपले कार्याला सलाम

    उत्तर द्याहटवा
  2. खारेगाव तलाव जवळ एक गधेगळ दिसली, याबद्दल काही माहिती आहे का?

    उत्तर द्याहटवा