रविवार, ३१ ऑगस्ट, २०२५

धाराशिव जिल्ह्यातील भूम शहराचा इतिहास व तेथील शिलालेख

धाराशिव जिल्ह्यातील भूम शहराचा इतिहास व तेथील शिलालेख

भूम हे धाराशिव जिल्ह्यातील तालुक्याचे एक ठिकाण आहे. बालाघाट डोंगररांगांनी चहूबाजूंनी वेढल्याने तसेच बाणगंगा नदीकिनाऱ्यावर वसल्याने भूम हे एक अत्यंत निसर्गरम्य ठिकाण बनले आहे. एकंदरीत भूम व आसपासचा परिसर निसर्गाच्या वरदहस्तामुळे प्राचीन काळापासून मानवाला खुणावत आला असावा, यात तिळमात्र शंका नाही.

भूम या ठिकाणाचा इतिहास मांडायचा झाल्यास आपण १२-१३ व्या शतकापर्यंत सहज मागे जावू शकतो. एका आख्यायिकेनुसार भौमासुर राक्षसाचा येथे वध झाल्याने या ठिकाणाला ‘भूम’ हे नाव प्राप्त झाले. येथे असणारे पुरातत्त्वीय अवशेष पाहता या परिसरास शैव-नाथ, वैष्णव, रामदासी, दत्त, शाक्त संप्रदायाचा वारसा लाभल्याचे दिसून येते. १२व्या शतकात हा भाग कल्याणीच्या चालुक्य घराण्याच्या अधिपत्याखाली होता. याच सुमारास आलम प्रभू हे सिद्ध नावारूपास आले होते. त्यांची समाधी भूम येथे आहे. हठयोगप्रदीपिका व अन्य ग्रंथांत त्यांचा नामनिर्देश आढळून येतो. हठयोगप्रदिपिकेत ते नाथ संप्रदायाशी निगडीत असलेल्या परंपरेशी संबंधित असल्याचे दिसून येते. लिंगायत संप्रदायातही त्यांना महत्त्वाचे स्थान प्राप्त आहे.

Shiva temple, Bhoom

पुरातत्त्वीय पुराव्यांकडे पाहता भूम कसबा मानल्या जाणाऱ्या भागातील महादेवाचे एक प्राचीन मंदिर महत्त्वाचे आहे. मंदिर परिसरात अनेक वीरगळी व मुर्तीशिल्पे इतस्ततः पडलेली आहेत. या मंदिराशेजारी काही समाधीही दिसून येतात. मंदिराचे कला-स्थापत्य व अन्य अवशेष पाहता ते सुमारे १३व्या शतकातील वाटतात. या भौतिक पुरावशेषांमुळे अगदी खात्रीने भूम हे ठिकाण किमान १३व्या शतकापासून अस्तित्त्वात होते, हे स्पष्ट होते. कल्याणी चालुक्य व यादव कालखंडानंतर हा भाग प्रथमतः बहमनी व नंतर निजामशाहीच्या अमलाखाली आला. त्यानंतर हा भाग हैदराबाद येथील निजामांच्या ताब्यात राहिला. प्रत्यक्षात मात्र निंबाळकर घराण्याने या परिसरात आपला अंमल प्रस्थापित केल्याचे अनेक पुराव्यांद्वारे दिसून येते. भारत स्वतंत्र होईपर्यंत निंबाळकर घराणे या भागात सक्रीय होते. 

Unknown Samadhi (?), Bhoom

यादव कालखंडातील प्राप्त अवशेषांनंतर बराचसा अंतराल या भागात दिसून येतो. सुमारे सोळाव्या-सतराव्या शतकात हे ठिकाण नाथ संप्रदायाच्या परंपरेतील संत जनीजनार्दन यांच्यामुळे नावलौकिकास प्राप्त झाले. भूम हे त्यांचे आजोळ आणि जन्मभूमी. आजही येथे त्यांची समाधी पहावयास मिळते. या समाधीवर सतराव्या शतकातील एक लेख आहे. संत जनीजनार्दन यांच्यानंतर दुसरे प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व म्हणजे संत रामदासांचे पटशिष्य कल्याणस्वामी. त्यांची समाधी भूम तालुक्याच्या शेजारी असणाऱ्या परांडा तालुक्यातील डोमगाव येथे आहे. या रामदासी परंपरेशी संबंधित एक अन्य समाधी भूम येथे आहे.

भूम येथे निंबाळकर घराण्याशी संबंधित चार शिलालेख आहेत. या शिलालेखांचे प्रकाशन यापूर्वी कोठेही झालेले आढळून येत नाही. भूम हे स्थान थोरात घराण्याशीही संबंधित आहे. भूम शहरात शिव मंदिर, केशवराज मंदिर, सिद्धनाथ, मंदिर, राम मंदिर, जगदंबा मंदिर, दत्त मंदिर, हनुमान मंदिर, रामदासी संप्रदायातील मठ व काही हिंदू-इस्लामिक स्थापत्यात निर्मित भव्य समाधी आहेत.

Siddhanath Temple, Bhoom

संत जनीजनार्दन

संत जनीजनार्दन यांच्या वडिलांचे नाव वसुदेव व मातेचे नाव देवकी होते. वसुदेवपंत हे विजापूर दरबारी कमाविसदार होते. वसुदेवपंतांची पत्नी ही भूमच्या देशमुखांची कन्या होती. तिचे माहेरकडील नाव ‘जनी किंवा ‘जनाबाईतर सासरचे नाव देवकी होते. या वसुदेव-देवकीच्या उदरी कृष्णाष्टमीच्या शुभ मुहूर्तावर जनार्दनाचा जन्म भूम येथे त्यांच्या आजोळी झाला. जनीजनार्दनाचे परमगुरु कंथडीनाथ हे वसुदेवपंताचे देखील गुरु होते. आदिलशहाच्या दरबारात जनीजनार्दन आपल्या वडिलांच्या जागेवर कमाविसदार म्हणून काम पाहत होते. एकदा विजापूरभागात प्रचंड दुष्काळ पडला असता, त्यांनी मुक्तहस्ताने धान्य कोठार उघडून देऊन लोकांचे रक्षण केले. यामुळे अर्थातच त्यांना आदिलशहाच्या नाराजीस सामोरे जावे लागले. परंतु यशस्वीपणे ते यातून बाहेर पडले. अशा आशयाची कथा प्रसिद्ध आहे. गणपती हे जनीजनार्दनांचे उपास्य दैवत होते. ‘निर्विकल्प’ हा कृष्ण-उद्धव-संवादरूपाने विविध आध्यात्मिक प्रश्नांचे विवरण करणारा ग्रंथ, काही हिंदी-मराठी पदे, महावाक्यविवरण हे वेदान्तरपर प्रकरण आणि सीतास्वयंवर हे पौराणिक आख्यान जनीजनार्दन यांच्या नावावर आहे (पाटांगणकर, १९८३).

निंबाळकर घराणे:

भूम या ठिकाणाचा निजामकालीन निंबाळकर किंवा रावरंभा घराण्याशीही संबंध आलेला आहे. हे घराणे महाराष्ट्रातील प्रभावशाली सरदार घराणे आहे. फलटणचे बजाजी नाईक-निंबाळकर यांचे पुत्र महादजी व या महादजींचे पुत्र हे रंभाजी निंबाळकर होते. निजामांचे राज्य स्थापन करण्यात रंभाजी निंबाळकरांचा मोठा वाटा होता, त्यामुळे त्यांना ‘रावरंभा’ ही पदवी मिळाली. पुढे हे पदनाम या घराण्यातील इतर सरदारांना ही लावले गेले. रावरंभा किंवा निंबाळकर घराण्यातील या शाखेकडे जवळपास २२३ वर्षे (१७०७ ते १९४२) सत्ता किंवा प्रतिनिधित्त्व होते. हैद्राबादच्या निजामांचा महाराष्ट्रातला मुख्य आधार म्हणजे निंबाळकर घराणे. निजामाच्यावतीने त्यांना धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग, तुळजापूर, अपसिंगा, भूम, परांडा,  सोलापूर जिल्ह्यातील माढा, मोहोळ, करमाळा, शेंद्री, रोपळे, दहीगाव, बार्शी, पंढरपूर, परभणी जिल्ह्यातील पाथरी, लातूर जिल्ह्यातील राजुरी, बीड-धारूर, तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील काही गावे आणि २२ हजारांची मनसब मिळाली होती. या घराण्यातील रंभाजी, जानोजी, आनंदराव, रावरंभा दुसरे व खंडेरावजी यांसारखे पराक्रमी पुरुष निजामांचे मुख्य आधार राहिले. रावरंभा रंभाजी यांना खंडेराव, जानोजी, सुलतानजी, राव महादजी असे चार पुत्र होते. त्यातील द्वितीय पुत्र जानोजी हे त्यांच्या पश्चात गादीवर बसले.

रावरंभा जानोजी निंबाळकर सु. इ.स. १७२० ते १७६३ या कालखंडात अत्यंत कार्यरत होते. त्यांनी निजाम, पेशवे, मुगल, फ्रेंच व इंग्रज यांच्यात मुत्सद्देगिरी साधत आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. त्यांनी निजाम-पेशवे वाद शमवले, त्रिचनापल्ली मोहिमेत भाग घेतला. स्थापत्यकलेत दाक्षिणात्य व उत्तर भारतीय शैलींचा संगम साधून करमाळ्याचे कमलादेवी मंदिर (इ.स. १७४०) बांधले. तसेच तुळजापूरची तुळजाभवानी, जेजूरीचा खंडोबा, मोरगाव व माळेगाव इत्यादी देवस्थानांना दान दिले. हैद्राबादेतील राजारावरंभा देवडी, मूसापेठ मंदिर, गोवळकोंड्यातील काही वास्तू हे त्यांच्या सांस्कृतिक कर्तृत्त्वाची छाप दर्शवितात. ६ ऑगस्ट १७६३ रोजी राक्षसभूवन मोहिमेदरम्यान त्यांचे निधन झाले. राजे जानोजी यांना राजा आनंदराव, महाराव, धारराव, जसवंतराव असे चार पुत्र होते. राजे आनंदरावांचे पुत्र हे राजे जयवंतराव होत. जयवंतरावांना राजेखंडेराव (मृत्यू १८१७) व राजेआनंदराव (मृत्यू १८४३) हे दोन पुत्र होते. तर आनंदरावांचे पुत्र हे राजेव्यंकटराव होत (सरदेसाई, १९५९: ७३). रावरंभा जानोजीराव हे मध्ययुगीन महाराष्ट्रातील पराक्रमी सरदार, मुत्सद्दी, कलाप्रेमी व दानशूर राजे होते.

अशा या इतिहास संपन्न भूम या ठिकाणी एकूण १० शिलालेख आढळून आले आहेत. यापूर्वी या शिलालेखांवर म्हणावा तसा प्रकाश टाकण्यात आला नव्हता. या शिलालेखांचे सविस्तर वर्णन खालीलप्रमाणे देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. यातील काही शिलालेख हे पूर्वप्रकाशित देखील आहेत.

 

संत जनीजनार्दन समाधी लेख (शके १५२३/ इ.स. १६०१)

प्रस्तुत शिलालेख भूम कसब्यात संत जनीजनार्दन स्वामी यांच्या समाधीवर असून, ती समाधी वृंदावन स्वरूपाची आहे. समाधी पूर्वाभिमुख असून तिच्या वरच्या दर्शनी भागावर खोदीव लेख असलेली सुमारे २६ सेमी लांब व ५९ सेमी रुंद अशी शिळा बसवली आहे. शिळेवर सुरुवातीस संत जनार्दन व त्यांचे गुरु श्री. ढुंढिराज यांना नमन केल्यानंतर पुढे 'स्छाने हृषीकेश' हा गीतेतील श्लोक खोदला आहे. प्रस्तुत लेखावर काल्लोलेख नसला तरी हा लेख जनीजनार्दन यांच्या समाधीवेळचा म्हणजेच सुमारे इ.स. १६०१ च्या आसपासचा असण्याची शक्यता आहे. लेख पाच ओळींचा असून संस्कृत भाषेत व देवनागरी लिपीत खोदला आहे. या लेखाचे प्रथम वाचन डॉ.रा. चिं. ढेरे यांनी केले आहे. (ढेरे, १९६५)

Jani janardan Samadhi Inscription, Bhoom (c.1601CE)

शिलालेखाचे वाचन:

१. श्रीमंत्रमूर्ति श्री ढुंढिराज श्रीमज्जनार्दन

२. गुरवे नम: II स्छाने ऱ्हषीकेश त

३. व प्रकीर्त्या जगत्त्प्रऱ्हष्य त्त्यनुर

४. ज्यते च II रक्षांसि भिता निदिशो

५. द्रवंति सर्वेनमस्यंति च सिद्धसंघा:II

शिलालेखाचा अर्थ: श्रीमंत्रमूर्ती श्री. ढुंढिराज श्रीमज्जनार्दन गुरूंना नमस्कार असो. यानंतर श्रीमद् भगवद्गीतेच्या अध्याय ११मधील ३६वा श्लोक दिला आहे. अर्जुन कृष्णाचे विराट स्वरूप पाहून म्हणतो “हे ऋषीकेश! तुझ्या कीर्तीच्या स्मरणाने साऱ्या जगाला आनंद होतो, आणि ते तुझ्यावर प्रेम करू लागतात. राक्षस भीतीने चारी दिशांना पळून जातात, आणि सिद्धांच्या संघाकडून तुला सतत नमस्कार होतो.”

शिलालेखाचे महत्त्व: श्री. ढुंढिराज व जनीजनार्दन यांचा संबंध नाथ संप्रदायाशी होता. त्यामुळे नाथ संप्रदायाच्या इतिहासाच्या दृष्टीने हा लेख महत्त्वाचा आहे. या शिलालेखातून गीतेचा तत्कालीन समाजावर असणारा प्रभाव दिसून येतो. हा शिलालेख निजामशाहीतील असून त्या काळातील धार्मिक परिस्थिती समजण्याच्या दृष्टीनेदेखील महत्त्वाचा पुरावा आहे. १६व्या शतकात महाराष्ट्रात संत एकनाथ आणि त्यांचे समकालीन चार प्रमुख ग्रंथकार विठा रेणुकानंदन, जनीजनार्दन, रामाजनार्दन आणि दासोपंत मिळून ‘नाथपंचक’ मानले जात होते. यांतील संत जनीजनार्दन यांच्या काल निर्धारणाच्या दृष्टीने हा शिलालेख महत्त्वाचा ठरतो.  

शिलालेखातील श्लोक गुरूभक्ती, भगवन्नामाचा प्रभाव, अंतर्मनातील विकारांचा नाश आणि भक्तीने साधलेल्या उच्च अवस्थेतही विनयशीलतेचे महत्त्व शिकवतो. भारतीय योग-भक्ती परंपरेत गुरू हा मंत्रांचा मूळ, ज्ञानाचा प्रकाशक आणि मोक्षमार्ग दाखवणारा मानला जातो. हा शिलालेख भगवद्गीतेबरोबरच नाथ संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाशीही संबंधित असल्याचे दिसून येते.  नाथयोगी गुरूपरंपरेला सर्वश्रेष्ठ मानतात. तसेच ‘नामस्मरण’ आणि ‘जप’ यांना ही महत्त्व आहे. भगवंताचे नाव उच्चारल्याने मनशुद्धी, आनंद आणि एकाग्रता प्राप्त होते. हे सर्व तत्त्वज्ञान नाथयोग, हठयोग तसेच भक्तीपरंपरा या सर्वांमध्ये समानपणे महत्त्वाचे मानले जाते. जनीजनार्दन यांची दुसरी समाधी बीड येथील पाटांगण येथे आहे. त्यावर १५२४ असा शकाचा उल्लेख आहे, तसेच वर दिलेला गीतेतील श्लोक खोदला आहे. मठातील परंपरेनुसार पाटांगण येथील लेख भूम येथील लेखानंतर म्हणजेच एका वर्षानंतर खोदलेला आहे. त्यानुसार वरील लेखांत तारीख दिलेली नसली तरी सदर लेख साधारणपणे इ.स. १६०१ मधील ठरतो. 

Jani Janardan Samadhi, Bhoom
जनीजनार्दन पादुकावरील लेख

संत जनीजनार्दन यांच्या समाधीच्या पादुकांच्या ठिकाणी ‘श्री जनार्दन’ ही अक्षरे कोरली आहेत. या नामनिर्देशाव्यतिरिक्त अन्य कुठलाही उल्लेख त्यावर नाही. लेखातील अक्षरे तीन ओळीत कोरली आहेत. अक्षरे सुस्पष्ट असून ती देवनागरी लिपीत आहेत. अक्षरे कोरलेल्या शिळेची लांबी १८ सेमी व रुंदी १७ सेमी इतकी आहे.

Jani Janardan Samadhi Inscription No.2, Bhoom (c. 1602 CE)

शिलालेखाचे वाचन:

१.     “श्री

२.     जना

३.     र्दन”

शिलालेखाचा अर्थ: सदर समाधी ही संत जनार्दन यांची आहे, हे दर्शविण्याचा प्रयत्न दिसतो.

शिलालेखाचे महत्त्व: जनीजनार्दन यांच्या समाधीच्या आतील भागात ‘श्री जनार्दन अशी अक्षरे कोरलेली आहेत. यामुळे ही समाधी श्री. जनार्दन यांचीच आहे, हे स्पष्ट होते. पादुकांच्या ठिकाणी अक्षरे कोरली असलेली उदाहरणे दुर्मिळ आहेत. ही अक्षरेही वरील शिलालेखाच्या समकालीन म्हणजेच सुमारे इ.स. १६०१ साली कोरली असावीत.  

 

जनीजनार्दन समाधीच्या कठड्यावरील लेख (१३ फेब्रुवारी, शुक्रवार, इ.स. १७०२)

प्रस्तुत लेख बाजार चौकातील जनीजनार्दन यांच्या समाधीला असणाऱ्या कठड्यावर उत्तरेकडील भागावर कोरला आहे. या लेखाचे वाचन डॉ. विद्यासागर पाटांगणकर यांनी केले (पाटांगणकर, २०२५). लेख दोन ओळीत कोरला असून त्याची भाषा मराठी व लिपी देवनागरी आहे. या लेखांत शक काल १६२३, वृशानाव संवत्सर, माघ वद्य १३, या व्यतिरिक्त दुसरा विशेष उल्लेख नाही. सुमारे २५ सेमी लांब व ६० सेमी रुंद शिळेच्या पृष्ठभागावर हा लेख कोरला आहे. बहुदा समाधीला कठडा/चबुतरा बांधल्याची स्मृती जपणे, हे यामागील प्रयोजन असावे. जनीजनार्दनाच्या समाधीनंतर साधारणतः १०० वर्षांनी हा लेख कोरला असावा.  

Jani Janardan Samadhi Inscription No. 3 (1702 CE), Bhoom

शिलालेखाचे वाचन:

१. सके १६२३ वृशानाव संवत्छरे माघ

२. वद्य त्रयोदशी शिवरात्रि भृगुवार

शिलालेखाचा अर्थ: शके १६२३ (म्हणजेच १३ फेब्रुवारी, शुक्रवार, इ.स. १७०२) साली वृशानाम संवत्सरातील माघ महिन्यात वद्य त्रयोदशीला शिवरात्रीच्या वेळी शुक्रवारी (समाधीचा चबुतरा बांधला).

शिलालेखाचे महत्त्व: सदर लेखामुळे संत जनीजनार्दन यांची समाधी अगदी खात्रीने इ.स. १७०२च्या पूर्वी निश्चित करता येते. तसेच या समाधीवरील तिन्ही लेखांतील अक्षरवटिकेची तुलना करता हा लेख नंतर कोरला असावा, हे सहज लक्षात येते. जनीजनार्दन व नाथ संप्रदायाच्या दृष्टीनेही हा लेख महत्त्वाचा ठरतो.

 

कल्याणस्वामी मठातील समाधीवरील लेख (इ.स. १७५४) 

प्रस्तुत शिलालेख भूम येथील कल्याणस्वामी मठात असणाऱ्या समाधी (वृंदावन) वर आहे. समाधीचा चौथरा सुमारे ५ फूट उंच असून त्यावर मोर व हत्ती यांची शिल्पे आहेत. वृंदावनाच्या कोनाड्यात पादुका असून कोनाड्यावर दर्शनी भागात पूर्वाभिमुख एकूण सात ओळींचा लेख खोदला आहे. लेख खोदलेली शिळा ३५ सेमी लांब व ५२ सेमी रुंद आहे. प्रस्तुत लेख संस्कृत मिश्रित मराठीत असून लिपी देवनागरी आहे. या लेखाचे प्रथम वाचन श्री. गणेश शंकरदेव यांनी दिले असले तरी, त्याचे सविस्तर विश्लेषण केलेले आढळून येत नाही. शिलालेखावर मोठ्या प्रमाणात रंगलेपण केल्याने, त्याचे उघड डोळ्यांनी वाचन करण्यास मर्यादा येतात. परंतु त्याचे ठसे घेतल्यास वाचन व्यवस्थित होवू शकते. 

Inscription on Samadhi, Kalyan Swami Matha, Bhoom (1) (1754 CE)

Inscription on Samadhi, Kalyan Swami Matha, Bhoom (1) (1754 CE)

शिलालेखाचे वाचन:

१. श्रीराम कल्याणाशी कर ण (?) षअब्धी

२. साद्रि गणिते भाद्रेशिते पौर्णिमा: भावा

३. नाम तथा अदित्य प्रथमे यामार्ध ज

४. ली सिमा: नक्षत्र शततारका

५. शुभदिनी पावोनी मुक्तापुरी:

६. श्रीकल्याण पदाज्बी राहुनि हारी

७. दिना जना उधरि: श्री गुरुवे नाम

शिलालेखाचा अर्थ: श्री कल्याणस्वामींचे शिष्य श्री. हरी यांनी शके १६७६ साली (इ.स. १७५४) भावनाम संवत्सरात, भाद्रपद शुद्ध पौर्णिमेस रविवारी, दिवसाच्या पहिल्या प्रहरात (यामार्ध), जलसंधी (नदीकाठी/घाटावर) येथे, शततारका (शतभिषा) नक्षत्रात, स्वर्गागमण केले. एकंदरीत हा दिवस शुभ होता. श्री. कल्याणस्वामींच्या सानिध्यात राहून त्यांचे शिष्य श्री. हारी यांनी दीन-दुबळे व जनतेचा उद्धार केला.

शिलालेखाचे महत्त्व: यातील सहाव्या ओळीत 'श्रीकल्याण पदाब्जी राहूनि हारी' मधील 'हारी /हरी' हे नाव कल्याणस्वामींच्या 'हरि भूमकर' नामक एका शिष्याचे असावे. हा संदर्भ कल्याणस्वामीकृत 'श्री कल्याणस्तवन' यात दिसून येतो. रामदासी संप्रदायाच्यादृष्टीने व त्यातील गुरु-शिष्य परंपरेच्या आकलनासाठी तसेच प्रसाराच्या दृष्टीने हा लेख महत्त्वाचा ठरतो. रामदासी (समर्थ) संप्रदायाचे एक अन्य केंद्र डोमगाव, हे याच भागातील आहे, हे विशेष. रामदासशिष्य कल्याणस्वामींचा उल्लेख असल्यानेदेखील हा लेख महत्त्वाचा ठरतो. तसेच सदर लेख धार्मिक, सांस्कृतिक दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. मजकुरात शक संवत, महिना, तिथी, वार, नक्षत्र इत्यादी माहिती दिल्याने हा लेख कालगणनेच्या दृष्टीने ही महत्त्वाचा आहे. संभवतः भूम या स्थानाला मुक्तापुरी म्हटले गेले असावे. यामार्ध”, “जली सीमा”, “शततारका” अशा संज्ञा त्याकाळी शुभकाळ ठरविण्यास ज्योतिष-खगोलाचा आधार किती महत्त्वाचा होता, हे दर्शवितात.

 

सिद्धनाथ मंदिरातील लेख क्र. १ (मंदिराच्या सभामंडपाच्या उजव्या भिंतीवरील लेख) (डिसेंबर, इ.स. १७५७)

भूम शहराच्या कसबे भागाच्या मध्यात सिद्धनाथाचे मंदिर आहे. मंदिर साधारण असून सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. मंदिरावर सुस्थितीत शिखर असून त्यावर अनेक शिल्पे आहेत. या मंदिराच्या सभामंडपाला असणाऱ्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना एक-एक लेख आहेत. लेखांची भाषा मराठी असून लिपी देवनागरी आहे. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूचा लेख कोरीव तर डाव्या बाजूचा लेख हा खोदीव स्वरूपाचा आहे. या शिलालेखांवर रंगलेपन केल्याने ते सहजपणे ओळखता येत नव्हते. दोन्ही लेखांवरील रंग काढून त्याचे ठसे घेतल्यानंतर प्रथमतःच या लेखांचे वाचन येथे होत आहे. दोन्ही लेख इ.स. १७५७ सालातील असून त्यांचा मजकूर साधारणपणे एक सारखाच आहे. यामध्ये प्रामुख्याने निंबाळकर राजघराण्यातील जानोजी निंबाळकर व गोविंद खंडेराव यांनी सिद्धनाथ मंदिर बांधल्याचा उल्लेख आहे. मंदिराच्या सभामंडपातून बाहेर पडताना उजव्या भिंतीवर असलेल्या लेखाचे वाचन खालीलप्रमाणे आहे. सदर लेखाची लांबी ३० सेमी असून रुंदी ५१ सेमी आहे.

Siddhnath Temple Inscription (Right wall), Bhoom (1757 CE)

Siddhnath Temple Inscription (Right wall), Bhoom (1757 CE)

शिलालेखाचे वाचन:

१. श्री सिधनाथ चरणि तत्पर जानो

२. जि निंबाळकर देशमुख देशपांडे व

३. गोविंद खंडेराव देशमुख देशपांडे

४. प्रगणे भुम व मोकदम कसबे मज

५. कुर ग्रामाद (?) सिध सके १६७९

६. ईस्वर नामा संवछरे

शिलालेखाचा अर्थ: भूम परगणे व कसब्याचे मोकदम अनुक्रमे जानोजी निंबाळकर देशमुख देशपांडे व गोविंद खंडेराव देशमुख देशपांडे यांनी शके १६७९ साली ईश्वरनाम संवत्सरात (डिसेंबर, इ.स. १७५७) सिद्धनाथाचे मंदिर बांधले.

शिलालेखाचे महत्त्व: हा लेख अनेक दृष्टीने महत्त्वाचा आहे. विशेष म्हणजे रावरंभा (निंबाळकर) घराणे हे साधारणपणे निजामांच्या स्थापनेपासूनच या भागावर राज्य करीत होते, हे स्पष्ट होते. निंबाळकर घराण्याच्या वंशावळी व इतिहासाच्या दृष्टीनेही हा शिलालेख महत्त्वाचा आहे. सिद्धनाथाचे मंदिर बांधल्याची सुस्पष्ट तारीख मिळाल्याने तत्कालीन मंदिर स्थापत्य व कला समजण्यास मदत मिळते. सिद्धनाथाचे एक प्रसिद्ध प्राचीन मंदिर सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथे आहे. हे ठिकाण निंबाळकर घराण्याच्या मूळ ठिकाणापासून म्हणजेच फलटणपासून जवळ आहे. एखादी शाखा विस्थापित झाल्यानंतरदेखील मूळ श्रद्धा व भक्तिभावही सोबत कसा राहतो, या दृष्टीने या मंदिराचा विचार केला जावू शकतो. या शिलालेखाच्या माध्यमातून सरदार जानोजी निंबाळकर यांच्या कर्तृत्वावर प्रकाश पडतो. त्यांचे मंदिर स्थापत्यातील योगदान स्पष्ट होते. गोविंद खंडेराव यांची ओळख पटत नाही. ते बहुदा जानोजी निंबाळकर यांचे थोरले बंधू खंडेराव निंबाळकर यांचे चिरंजीव असावेत, असे दिसते. राजे जानोजी व खंडेराव हे दोघेही देशमुख व देशपांडे असल्याने त्यांचे राजकीय क्षेत्रातील महत्त्व दिसून येते. या कालखंडात भूम हे ठिकाण परगण्याचे ठिकाण होते, यातून याचे प्रशासकीय महत्त्व अधोरेखित होते.  

 

सिद्धनाथ मंदिरातील शिलालेख क्र. २ (सभामंडपाच्या बाहेरील डावीकडील भिंतीवरील लेख) (इ.स. १७५७)

सिद्धनाथ मंदिरातील सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूच्या भिंतीवर खोदीव स्वरूपाचा सात ओळींचा मराठी भाषा व देवनागरी लिपीतील लेख आहे. हा लेख ३० सेमी लांब व ३९ सेमी रुंद आकाराच्या शिळेवर कोरला आहे. याद्वारे सिद्धनाथाचे मंदिर बांधल्याची स्मृती जपण्याचे प्रयोजन दिसते.

Siddhnath Temple Inscription (Left wall), Bhoom (1) (1757 CE)

Siddhnath Temple Inscription (Left wall), Bhoom (2)

शिलालेखाचे वाचन:

१. सके १६७९ इस्वर नाम सव

२. छरे मार्गेस्वर शुध पंचमि इंदु

३. वार जानोजि निंबाळकर देसमु

४. ख देसपांडे व गोविंद खंडेराव

५. देसमुख देसपांडे प्रगणे भुम

६. व मोकदम कसबे मजकुर या

७. नि देवालय सिध केलें

शिलालेखाचा अर्थ: भूम परगणे व कसब्याचे मोकदम अनुक्रमे जानोजी निंबाळकर देशमुख देशपांडे व गोविंद खंडेराव देशमुख देशपांडे यांनी शके १६७९ साली ईश्वरनाम संवत्सरातील मार्गशीर्ष महिन्यात शुद्ध पंचमीला सोमवारी (डिसेंबर, इ.स. १७५७) सिद्धनाथाचे मंदिर बांधले.

शिलालेखाचे महत्त्व: वर नमूद केल्याप्रमाणे हा लेख अनेक दृष्टीने महत्त्वाचा आहे. या मंदिरातील दोन्ही लेखातील मजकूर साधारणपणे सारखाच आहे. त्यामुळे येथे विशेष काही लिहिणे गरजेचे वाटत नाही. परंतु प्रस्तुत लेखांत संवत्सर, तारीख, वार स्पष्टपणे नमूद केले आहेत. परंतु लेखांची तारीख तपासता, थोडीशी विसंगती आढळून येते. बहुदा याच कारणास्तव एकसारखाच मजकूर ठेवून दुसरा लेख घडविला असावा. शिलालेखात विशेषतः वारामध्ये विसंगती आढळून येते. शिलालेखात दिल्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यात शुद्ध पंचमी इंदुवार म्हणजेच सोमवार येतो.  परंतु वास्तवात या दिवशी गुरुवार आहे. त्यामुळे वार चुकला असावा, असे दिसते.  

 

जगदंबा मंदिरावरील शिलालेख क्र.१.

भूम कसब्यात बाणगंगा नदीकिनारी पूर्वाभिमुख असे जगदंबेचे छोटे पण सुंदर मंदिर आहे. मंदिराच्या गर्भगृहात समाधीही आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या वर दर्शनी भागावर मराठी भाषा व देवनागरी लिपीत एक लेख खोदला आहे. लेख असलेल्या शिळेचा मध्यभाग सुमारे ३६ सेमी लांब व ४० सेमी रुंद आहे. तर बाहेरील भाग ४३ सेमी लांब व ४६ सेमी रुंद आहे. लेख एकूण ११ ओळींचा असून सुस्पष्ट व वाचनीय आहे. शेवटच्या ओळींतील काही भाग तितकासा स्पष्ट होत नाही. लेख उंच ठिकाणावर असल्याने त्याचे ठसे घेणे अवघड आहे. शेवटच्या दोन ओळींतील मजकूर अपूर्ण आहे, तसेच तो व्यवस्थित खोदलेला नाही. वरील लेखही यापूर्वी इतरत्र कुठे प्रकाशित झालेला दिसून येत नाही. 

Jagdamba temple Inscription No.1, Bhoom 
शिलालेखाचे वाचन:

१. II श्री जगदंबा प्र: II

२. श्रीमंत महाराज राजेरावरंभा जैवंत बहादुर

३. निंबाळकर जागीरदार साहेब हे तालूक भूम

४. जागीर एथे मिती पौष शुध्ध ९ शके १८०२ विक्रम

५. नाम संवत्सरे रोजी कैलासवासी झाले त्यांचे स

६. माधी देवालय देवीचे काम

७. श्रीमंत महाराज राजे दत्तात्रयराव बहा

८. दुर यांनी सुरु केले ते शके १८२३ साली पुरे जहाले

९. त्यात श्रींची स्थापना ही राजेसाहेबांणी शके :

१०. १८२ ५(?) नाम संवत्सरे मिती

११. रोजवारी केली आहे(?) तारीख पा (?)++ सन++(२३?) फसली II (छ?)

शिलालेखाचा अर्थ: श्री. जगदंबेला नमन करून, भूम या जागीरीच्या ठिकाणी श्रीमंत महाराज राजे रावरंभा जेवंत बहादुर निंबाळकर जागीरदार साहेब पौष शुद्ध ९ शके १८०२ (रविवार, ९ जानेवारी, इ.स. १८८१) विक्रमनाम संवत्सरात कैलाशवासी झाले. त्यांचे समाधी देवालय व जगदंबा देवीच्या मंदिराचे काम श्रीमंत महाराज राजे दत्तात्रयराव बहादुर यांनी सुरु केले व ते शके १८२३ साली (इ.स. १९०१) पूर्ण झाले. तसेच श्रींची (जगदंबा देवी?) स्थापना ही राजेसाहेब (राजे दत्तात्रयराव) यांनी शके १८२ ५(?) (१९०३?) रोजी नाम संवत्सरात मिती रोज वारी केली आहे. या उल्लेखांनंतर फसली तारीख दिली आहे.   

शिलालेखाचे महत्त्व: निंबाळकर घराण्यातील वंशावळ व धार्मिक कार्य समजण्याच्या दृष्टीने हा लेख महत्त्वाचा आहे. राजे दत्तात्रयरावांनी सदर समाधीचे बांधकाम केल्याचे स्पष्ट होते. भूम शहरातील अन्य शिलालेख व या शिलालेखातून निंबाळकर घराण्यातील व्यक्तींचे कर्तृत्त्व स्पष्ट होते. सदर लेख विसाव्या शतकाच्या सुरुवातीस कोरला असावा.

 

जगदंबा मंदिराच्या उंबऱ्यावरील शिलालेख (क्र.२.)

जगदंबा मंदिराच्या उंबऱ्यावर चार ओळींचा मराठी भाषेतील व देवनागरी लिपीतील सुस्पष्ट लेख आहे.

Jagdamba Temple Inscription No.2. Bhoom
शिलालेखाचे वाचन:

१. चर्ण कमली लीन राणी कृष्णा

२. बाई व सुत राजे दत्तात्रयराव

३. संस्थान भुम

४. शके १८२५

शिलालेखाचा अर्थ: संस्थान भूम येथील राणी कृष्णाबाई व त्यांचे पुत्र दत्तात्रयराव चरणकमली लीन झाले. शके १८२५ (इ.स. १९०३)

शिलालेखाचे महत्त्व: निंबाळकर घराण्यातील व्यक्तींची अधिक माहिती मिळविण्याच्या दृष्टीने हा लेख महत्त्वाचा आहे.

 

दत्त मंदिरावरील शिलालेख (जानेवारी-फेब्रुवारी, इ.स. १८८८)

भूम कसब्यातच दत्ताचे छोटे मंदिर आहे. जगदंबा मंदिर व दत्त मंदिर समकालीन वाटतात. दत्त मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या वरती पाच ओळींचा अलीकडील काळातील लेख आहे. शिलालेख शुद्ध मराठीत असून देवनागरी लिपीत आहे. य लेखावर रंगलेपन हे अतिप्रमाणात केल्याने त्यावरील रंग काढणे कठीण आहे. आम्ही तसा प्रयत्न केला पण यश आले नाही. परंतु यापूर्वीच रंगकाम करणाऱ्यांनी शिलालेखातील शब्दांवर रंगांच्या मदतीने अक्षरे गिरवली होती. त्यावरून केलेले वाचन येथे दिले आहे. मूळ शिलालेखात व नंतरहून त्यावर गिरवलेल्या लेखात थोडीशी विसंगती राहण्याची शक्यता आहे. लेख कोरलेली शिळा २६ सेमी लांब व ४८ सेमी रुंद आहे. 

Datta temple Inscription, (1888 CE), Bhoom

शिलालेखाचे वाचन:

१. II श्री दत्तात्र्य प्र: II

२. श्री दत्तात्र्य यांची मंदिरची स्थापना शके १८०९ स

३. र्वजित संवत्सरे मीती माघ कृष्ण पक्ष

४. रुधासरे विरशैव पंचमंडळे तालुके भूम

५. याणी हे देवालय बांधिले आहे संवत १९४४

शिलालेखाचा अर्थ: श्री दत्तात्रय मंदिराची स्थापना शके १८०९ (१३ जानेवारी–१०फेब्रुवारी, इ.स. १८८८) सर्वजित संवत्सरे, मिती माघ, कृष्णपक्ष रुधासरे रोजी भूम तालुक्यातील विरशैव पंचमंडळांनी केली. यावेळी संवत १९४४ होते.

शिलालेखाचे महत्त्व: दत्त संप्रदायाचा अभ्यास व प्रसार यादृष्टीने हा लेख महत्त्वाचा आहे. लेखांत शक सालाबरोबरच विक्रम संवतही दिले आहे, हे विशेष.

वरील शिलालेखांव्यातिरिक्त अलीकडच्या काळातील एक शिलालेख हनुमान पारावर कोरला आहे. परंतु रंगलेपन अति प्रमाणात केल्याने त्याचे वाचन कठीण आहे. सदर संशोधनात माझे संशोधक विद्यार्थी श्री. साई अभिषेक तसेच प्रा. डॉ. शिवाजी वाघमोडे यांचे सहकार्य लाभले.

 

Hero and Sati, Bhoom