पिंपळे जगताप (जिल्हा पुणे) येथील धर्मनाथ मंदिर व मराठी शिलालेख
(Dharmnath temple and Marathi inscriptions at Pimple Jagtap in Pune District)
पुणे शहरापासून सु. ३७ किमी अंतरावर तसेच भीमा कोरेगावपासून
अवघ्या सात किमी अंतरावर पिंपळे जगताप नावाचे एक छोटेसे गाव आहे. या गावाच्या
बाहेरून एक लहान ओढा वाहतो. गावात जगताप आडनावांची बरीच कुटुंबे राहतात, तसेच
गावाची पाटीलकीदेखील वर्षांनुवर्षे त्यांच्याकडेच राहिली आहे. या सर्व कारणांमुळे या
गावाच्या नावामागे ‘जगताप’ हे प्रत्यय रूढ झाले आहे. तसेच महाराष्ट्रात ‘पिंपळे’
नावाची अनेक गावे असल्याने हे गाव ‘जगतापांचे पिंपळे’ म्हणून ओळखले जाते. या गावात
धर्मनाथ, महादेव,
विठ्ठल, गणेश, मारुती, दत्त यांची मंदिरे व काही विहिरी आहेत. या गावातील सर्व मंदिरांमध्ये
धर्मनाथाचे मंदिर भव्य व तुलनेने जुने आहे.
धर्मनाथ मंदिर, पिंपळे जगताप (Dharmnath temple, Pimple Jagtap)
पिंपळे गावाच्या मध्यभागी जगताप-पाटील यांच्या गढीजवळ इ.स. १७७९ मध्ये धर्मनाथाचे मंदिर (१८.७०९१०५, ७४.०६०७३९) बांधण्यात आले. मंदिर एका विशाल प्राकारभिंतीने वेढले असून याला पूर्वेकडून एक द्वार आहे. द्वारातून आत आल्यानंतर वाहन म्हणून वाघाचे शिल्प व समोर एका उंच जोत्यावर धर्मनाथाचे मंदिर दिसते.
मंदिरासमोरील चार पायऱ्या
चढून आपण सभामंडपात प्रवेश करतो. मंडपाच्या दर्शनी भागात तीन सुंदर कमानी असून त्यांवरती
दोन्ही बाजूंना दोन शरभ, दोन नाथ-योगी व दोन हत्तींवर बसलेले लढवय्ये यांची
पाषाणातील शिल्पे दिसतात. तसेच दोन हत्तींच्या मध्यभागी चतुर्भुज विष्णूचे (?)
शिल्प असल्याचे दिसून येते. मूर्तीच्या हातांत तलवार, चक्र, शंख व गदा ही आयुधे आहेत. या सर्व शिल्पांच्या वरती दोन कोपऱ्यांत दोन व
मध्यभागी एक असे तीन नाथ-योगींची शिल्पे कोरली आहेत. यांतील मध्यभागातील योगी दोन
वाघांच्या मध्ये बसलेला असून हे संभवतः धर्मनाथांचे शिल्प असावे. धर्मनाथ मंदिर (दर्शनी भाग), पिंपळे जगताप
![]() |
धर्मनाथ (?), पिंपळे जगताप |
शिलालेखाचे वाचन:
II श्री II
II श्री धर्मराजश्रींचे चरण अर्पन राघोजी बीन
र II
II त्नोजी पाटील जगताप मोकदम मौजे पींपळे
तर्फ
चाकन प्रांती श्रीमती गोदाबाई गाईकवाड यांचा
II सुत सयाजीराव बीन गोवींदराव गाईकवाड ते II
II ना सदास पेलेस मनेरषा शहर कसबे बडोदे II
II भाद्रपद ५ सेके १७०६ (१७०१ पाहिजे)
वीकारीनाम सं II
II वंसरे (अधिक) श्रावण मासे सुक्ल पक्षे १३
ईंदवासरे II
अर्थ : शालिवाहन शकाच्या १७०१ व्या वर्षी विकारीनाम संवत्सरातील (अधिक) श्रावण शुद्ध त्रयोदशी या दिवशी सोमवारी (२४ ऑगस्ट, १७७९) चाकण तर्फातील पिंपळे या गावातील राघोजी बीन रत्नोजी जगताप पाटील तसेच श्रीमती गोदाबाई गाईकवाड यांचा पुत्र सयाजीराव बीन गोविंदराव गाईकवाड तेना सदास पॅलेस मनेरषा शहर कसबा बडोदे यांनी हे मंदिर बांधून पूर्ण केले किंवा बांधायला.
![]() |
धर्मनाथ मंदिरातील शिलालेख, पिंपळे जगताप |
![]() |
गणेश, धर्मनाथ मंदिर, पिंपळे जगताप |
![]() |
धर्मनाथ, धर्मनाथ मंदिर, पिंपळे जगताप |
धर्मनाथ हे नाथ संप्रदायातील एक योगी होते. तसेच गुजरात येथील धिनोधर मठाचे ते महंत होते. त्यांचा कालखंड १४व्या शतकातील सांगितला जातो. महाराष्ट्रामध्ये त्यांचे महत्त्व कसे वाढले याबाबत निर्णायकपणे सांगता येत नाही. परंतु पिंपळे गावातील धर्मनाथ मंदिरातील शिलालेखामुळे हे कोडे थोडेसे स्पष्ट करून सांगता येऊ शकते. असे सांगितले जाते की या गावात जगताप-पाटील यांच्या घरी बडोद्याच्या गायकवाड घराण्यातील मुलगी सून म्हणून दिली होती. गायकवाड घराण्याचे राज्य गुजरातमध्ये सर्वदूर पसरले होते. त्यामुळे कच्छ परिसरातील धर्मनाथ या सत्पुरुषाच्या नावलौकिकाचा प्रभाव यांच्यावरही पडला असावा. पुढे गायकवाड घराण्यातील मंडळींचा पिंपळे गावाशी संपर्क आल्याने तेथे धर्मनाथांचे मंदिर बांधण्यात आले असावे. या गावाच्या जुन्या भागात धर्मनाथांची पाउतके आजही दाखविली जातात.
श्री. तेंडुलकर यांनी संपादित केलेल्या शिलालेखाशिवाय पिंपळे-जगताप
येथे अजून तीन अप्रकाशित लेख मला माझ्या सर्वेक्षणात आढळून आले. यातील पहिला लेख गावाबाहेरील
महादेव मंदिरात आहे. दुसरा लेख माईंच्या विहिरीत (बारव) आहे. तर तिसरा लेख
नानासाहेबांच्या विहिरीत आहे. माई व नानासाहेब यांच्या नावाने असलेल्या विहिरी
चावीच्या आकाराच्या आहेत. या विहिरींच्या पायऱ्या उतरताना डाव्या-उजव्या बाजूंना
असलेल्या देवळ्यांत गणेश व शिवलिंग ठेवलेले दिसते.
शिलालेख क्र. १. (महादेव मंदिरातील लेख)
पिंपळे गावातील महादेव मंदिर साधारण असून ते हनुमान
मंदिराच्या मागे आहे. या मंदिराचा सभामंडप ४५० X ४५० सेमी आकाराचा असून मध्यभागी चार सपाट स्तंभ व भिंतींना आठ
देवळ्या आहेत. मंदिराच्या गर्भगृहाचा आकार ३०० X ३०० सेमी
इतका आहे. गर्भगृहात मध्यभागी शिवलिंग असून मागे एक मोठी देवळी/देवकोष्ठ आहे.
गर्भगृहात प्रकाशयोजनेसाठी उजव्या व डाव्या भिंतींना झरोखे ठेवले आहेत. या
मंदिरासमोर दोन मोठी नंदीशिल्पे दिसतात.
महादेव मंदिर, पिंपळे जगताप
महादेव मंदिराचे सर्वांत मोठे वैशिष्ठ्य म्हणजे
गर्भगृहाच्या द्वाराच्या उजव्या बाजूला असणारा १० ओळींचा मराठी शिलालेख. हा लेख ४०
सेमी उंच व २७ सेमी रुंद अशा गुळगुळीत केलेल्या शिळेवर कोरला आहे. शिलालेख स्पष्ट
असल्याने सहज वाचता येतो. या लेखाचे वाचन प्रथमच येथे दिले जात आहे.नंदी, महादेव मंदिर, पिंपळे जगताप
लेखाचे वाचन:
१.
श्री
२.
श्री शिवसाभं चरणि त
३.
त्पर रघुनाथराव सुत
४.
विटलराव पाटिल ज
५.
गताप मोकदम मौ
६.
जे पिपळे तरफ चाक
७.
ण सन १२४९ शके १७६१
८.
विकारिनाम सवसरे
९.
श्रावण शुक्ल ३ ईंदुवास
१०.
र शुभं भवतु
![]() |
महादेव मंदिरातील शिलालेख, पिंपळे जगताप |
अर्थ: पिपळे तर्फ चाकण येथील शिवभक्त रघुनाथराव पाटील जगताप यांचे पुत्र मोकदम
विठ्ठलराव पाटील जगताप यांनी विकारीनाम संवत्सरात श्रावण महिना व शुक्ल ३, सोमवारी, शके १७६१, सन (फासली) १२४९
म्हणजेच इ. स. १२ ऑगस्ट, १८३९, सोमवार या दिवशी महादेव मंदिराचे बांधकाम सुरु किंवा पूर्ण केले.
जी.पी.एस.: (१८.७०९२३९, ७४.०५९४९३)
शिलालेखाचे स्थान: महादेव मंदिरातील गर्भगृहाच्या दर्शनी भागावर
प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला एका गुळगुळीत केलेल्या शिळेवर लेख कोरला आहे.
अक्षरपद्धती: कोरीव व स्पष्ट स्वरूपाचा लेख आहे.
भाषा: मराठी
लिपी: देवनागरी
प्रयोजन:- मंदिर बांधल्याची स्मृती जपणे.
मिती/वर्ष: शके १७६१ विकारीनाम संवत्सरे श्रावण शुक्ल ३ ईंदुवासर (सोमवार)
काळ वर्ष:- एकोणिसाव्या शतकाचा आरंभिक काळ= इ.स. १२ ऑगस्ट, १८३९ सोमवार
कारकीर्द:- ब्रिटीश/गायकवाड संस्थान
व्यक्तिनाम:- रघुनाथराव पाटील जगताप व विठ्ठलराव पाटील जगताप
ग्रामनाम:- पिंपळे व चाकण
काही शब्दांची शुद्ध रूपे व अर्थ: चरणि=चरणी, विटलराव=विठ्ठलराव, सवसरे=संवत्सरे, इंदुवासर=सोमवार
शिलालेखाचे
महत्त्व:- या शिलालेखामध्ये या गावातील इतर लेखांप्रमाणे
काही शब्दांचे संक्षिप्त अर्थ दिले नसून ते पूर्णपणे कोरले आहेत. उदा. ‘पाा’ हे
संक्षिप्त रूप ‘पाटील’ असे पूर्ण कोरले आहे. लेखातील शब्द सध्या प्रचलित असलेल्या मराठी
भाषेच्या जवळ आहेत. शालिवाहन शके या कालगणनेशिवाय फासली १२४९ हे सालही लेखात दिले
आहे, हे विशेष आहे. ब्रिटीश काळातही
जगताप घराण्यातील व्यक्तींना मानाचे स्थान असावे किंवा त्यांचा दबदबा या काळातही सुरु
असल्याचे दिसते. ब्रिटीश काळातही हिंदू मंदिरे बांधली जात होती, हेही दिसून येते. या
लेखातील काही अक्षरांवरती रेषा ओढलेल्या नाहीत. तसेच लेख कोरताना अगोदर आखणी
केल्याचे दिसून येते.
संदर्भ: IE, A.D. 1800 to A.D. 2000, p.81.
शिलालेख क्र. २. (माईंच्या मळ्यातील विहीर लेख)
पिंपळे गावाच्या वेशीवर शिलालेख असणाऱ्या चावीच्या
आकाराच्या दोन विहिरी आहेत. यांपैकी एक शिलालेख गावाच्या पश्चिमेस असणाऱ्या माईंचा
मळा येथील बांधीव विहिरीत आहे. संपूर्ण विहीवर झाडे-झुडपांचे साम्राज्य वाढल्याने येथे
जाण्यास थोडी अडचण निर्माण होते. विहिरीच्या पायऱ्या उतरताना समोरील भिंतीवर सदर लेख
सहज लक्ष वेधून घेतो. हा लेख कोरीव स्वरूपाचा असून पाच ओळींचा आहे. लेखाची लिपी देवनागरी
असून भाषा मराठी आहे. तसेच तो उघड्या डोळ्यांनीही सहज वाचता येतो.
![]() |
माईंच्या विहिरीतील शिलालेख, पिंपळे जगताप |
![]() |
माईंच्या विहिरीतील शिलालेख |
१.
श्री धर्मज चरनी तत्पर आनंदराव
२.
सुत देवराव पाा व वीटलराव सुत
३.
क्रुष्णराव पाा जगताप माो पीपळे ताा चा
४.
कन सके १७३६ श्रीमुखनाम सवछरे
५.
माघ सुध १३ गुरुवार समोप्त (घ?) ती
अर्थ:- शालिवाहन शकाच्या १७३६ श्रीमुखनाम संवत्सरात माघ शुद्ध १३ म्हणजेच गुरुवार
इ.स. २ किंवा ३ फेब्रुवारी १८१४, या दिवशी मौजे पिंपळे तर्फ चाकण येथील आनंदराव
जगताप यांचे पुत्र देवराव जगताप पाटील व विठ्ठलराव जगताप पाटील यांचे पुत्र
कृष्णराव जगताप पाटील यांनी विहिरीचे बांधकाम पूर्ण केले.
शिळेचे मोजमाप: २२ सेमी उंच व ४० सेमी रुंद
जी.पी.एस.: (१८.७११३७८, ७४.०५९३५८)
शिलालेखाचे स्थान: विहिरीच्या पायऱ्या उतरताना समोरील दर्शनी
भागावर आहे.
अक्षरपद्धती: कोरीव स्वरूपाचा लेख आहे.
प्रयोजन:- विहीर बांधल्याची स्मृती जपणे.
मिती/वर्ष: शके १७३६ श्रीमुखनाम संवत्सरे माघ शुद्ध १३ गुरुवार
काळ वर्ष:- एकोणिसाव्या शतकाचा आरंभिक काळ= इ.स. २/३ फेब्रुवारी १८१४
गुरुवार
कारकीर्द:- उत्तर मराठा कालखंड
व्यक्तिनाम:- धर्मराज (धर्मनाथ), आनंदराव जगताप, देवराव
जगताप, विठ्ठलराव जगताप,
कृष्णराव जगताप (पाटील)
ग्रामनाम:- पिंपळे व चाकण
शिलालेखाचे महत्त्व:- जगताप पाटील घराण्यातील व्यक्तींची नावे या
शिलालेखात आल्याने,
याचा उपयोग या घराण्याची वंशावळ काढण्यासाठी होऊ शकतो. तसेच या घराण्यातील
व्यक्तींनी विहीर खोदून समाजोपयोगी कार्ये केल्याचे निदर्शनास येते.
संक्षेप: पाा=पाटील, माो=मोकादम, ताा=तर्फ, धर्मज=धर्मराज,
काही शुद्ध/अशुद्ध शब्दांची रूपे: सके=शके,
चरनी=चरणी, क्रुष्णराव=कृष्णराव, सवछरे=संवत्सरे, सुध=शुद्ध.
संदर्भ: IE, A.D. 1800 to A.D. 2000, p. 30
शिलालेख क्र. ३. (नानासाहेबांच्या विहिरीतील
लेख)
पिंपळे गावाच्या पूर्वेला मुख्य रस्त्याच्या कडेला एका
चावीच्या आकाराच्या विहिरीत हा लेख कोरलेला आहे. सदर विहिरीला नानासाहेबांची किंवा
दादासाहेबांची विहीर या नावाने ओळखले जाते. विहिरीत पायऱ्याने उतरताना समोरली
दर्शनी भागावर एक लेख कोरलेला आहे किंवा शिलालेख असलेली शिळा बांधकामात लावली आहे.
या विहिरीजवळ एका अज्ञात व्यक्तीची समाधी देखील दिसून येते.
![]() |
नानासाहेबांची विहीर, पिंपळे जगताप |
![]() |
नानासाहेबांच्या विहिरीतील शिलालेख, पिंपळे जगताप |
१.
श्री धरमराज प्रसन चेरनी तते
२.
पर रघोजी वलद रत्नोजी पाा जग
३.
ताप माो मवजे पीपळे ताा चाकन सके
४.
१७३१ शुक्लनाम सवछरे श्रावन सुध १
अर्थ:- शालिवाहन शकाच्या १७३१ शुक्लनाम संवत्सरात श्रावण शुद्ध १ म्हणजेच शनिवार इ.स.
१२ ऑगस्ट १८०९, या दिवशी मौजे पिंपळे तर्फ चाकण येथील राघोजी जगताप पाटील यांनी
विहिरीचे बांधकाम प्रारंभ किंवा पूर्ण केले.
शिळेचे मोजमाप: २४ सेमी उंच व ५९ सेमी रुंद
जी.पी.एस.: (१८.७०९७७१, ७४.०६४८२७)
शिलालेखाचे स्थान: विहिरीच्या पायऱ्या उतरताना समोरील दर्शनी
भागावर आहे.
अक्षरपद्धती: कोरीव स्वरूपाचा लेख आहे.
भाषा: अशुद्ध मराठी
लिपी: देवनागरी
प्रयोजन:- विहीर बांधल्याची स्मृती जपणे.
मिती/वर्ष: शके १७३१ शुक्लनाम संवत्सरे श्रावण शुद्ध १ शनिवार
काळ वर्ष:- एकोणिसाव्या शतकाचा आरंभिक काळ= इ.स. १२ ऑगस्ट १८०९ शनिवार
कारकीर्द:- उत्तर मराठा कालखंड (पेशवे)
व्यक्तिनाम:- धर्मराज (धर्मनाथ) व राघोजी जगताप (पाटील)
ग्रामनाम:- पिंपळे व चाकण
शिलालेखाचे महत्त्व:- रघोजी/राघोजी पाटील जगताप यांनी धर्मनाथांच्या
मंदिराशिवाय विहीर खोदण्याचे समाजोपयोगी कार्य केल्याचे दिसून येते. तसेच रघोजी हे
इ. स. १७७९ पासून ते इ.स. १८०९ पर्यंत
हयात असल्याचे धर्मनाथ मंदिर व या विहिरीतील लेखांवरून कळते. यामुळे त्यांची
कारकीर्द समजण्यास मदत मिळते. हे वरील लेखाचे महत्त्व सांगता येऊ शकते.
संक्षेप: पाा=पाटील, माो=मोकादम, ताा=तर्फ
काही अशुद्ध शब्दांची शुद्ध रूपे: धरमराज=धर्मराज, प्रसन=प्रसन्न, चेरनी=चरणी, ततेपर=तत्पर, मवजे= मौजे, सके=शके,
सवछरे=संवत्सरे, श्रावन=श्रावण, सुध=शुद्ध.
संदर्भ: IE, A.D. 1800 to A.D. 2000, p. 21.
एकंदरीत, या पिंपळे गावात जगताप-पाटील या घराण्याच्या
कृपेने मंदिरे व विहिरी बांधण्यात आल्या. धर्मनाथ मंदिर, गणपती मंदिर व विठ्ठल मंदिर ही मंदिरे त्यांच्या
स्थापत्य शास्त्रानुसार समकालीन वाटतात. वरील सर्व शिलालेखांमधून जगताप-पाटील
घराण्यातील व्यक्तींची ‘धर्मनाथ’ या महापुरुषावर असणारी निष्ठा दिसून येते. तसेच जगताप-पाटील
घराण्यातील व्यक्तींची माहिती मिळते. या घराण्यातील वंशावळ समजण्यास या
शिलालेखांचा उपयोग होतो. पिंपळे जगताप या गावात जगताप घराण्यातील राघोजी बीन
रत्नोजी पाटील जगताप यांचा इ.स. १७७९ साली प्रथम उल्लेख आढळून येतो. यानंतर इ.स.
१८०९ सालातील लेखात रघोजी पाटील जगताप यांचा उल्लेख आलेला आहे. बहुदा राघोजी
यानांच रघुनाथराव या नावाने नंतरच्या शिलालेखात संबोधले असावे. याशिवाय विठ्ठलराव, कृष्णराव, आनंदराव, व देवराव
या व्यक्तींचा नामनिर्देश लेखांत येतो. संभवतः विठ्ठलराव हे रघुनाथ/राघोजी यांचे
पुत्र असावेत.
याशिवाय मुळच्या बडोदा येथील गोदाबाई गायकवाड व त्यांचे
पुत्र सयाजीराव बीन गोविंदराव गायकवाड यांचे नामनिर्देश ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाचे
आहेत. गाव परिसरात काही तुळशी वृन्दावने व समाध्या आजही सुस्थितीत असल्याचे दिसून
येते.
जगताप वाडा, पिंपळे जगताप धर्मनाथ मंदिराचा सभामंडप, पिंपळे जगताप माईंच्या विहिरीतील लेख, पिंपळे जगताप जगताप पाटील यांचा वाडा, पिंपळे जगताप
Written by Dr Vijay Sarde