श्री क्षेत्र निरगुडे, जिल्हा पुणे
पुणे जिल्ह्यातील जुन्नरपासून १० किमी अंतरावरील ‘निरगुडे’ हे गाव येथे असणाऱ्या मारुती मंदिरामुळे प्रसिद्ध आहे. सह्याद्री पर्वताच्या उंच-सखोल डोंगररांगांनी वेढलेले हे गाव मीना नदीकिनारी वसले आहे. या नदीमुळे या भागात शेती फुलली आहे. त्यामुळे समृद्धीची गंगा अवतरली आहे. मीना नदीच्या दुसऱ्या काठावर ‘बेलसर’ नावाचे एक दुसरे गाव आहे. प्राचीन काळापासून या भागात वेगवेगळे कार्य-कलाप झालेले दिसून येतात. रोमन व्यापारी सर्वप्रथम या भागात स्थिरावल्याचे दिसून येते. जुन्नर परिसरात जेथे सुरुवातीच्या काळात लेणी खोदली गेली ते ‘तुळजा लेणी’ हे ठिकाण निरगुडे गावापासून खूपच जवळ आहे.
![]() |
मारुती मंदिर, निरगुडे |
तुळजा लेणी
जुन्नर परिसरातील सर्वांत प्राचीन बौद्ध (थेरवाद) लेणी-समूह म्हणून तुळजा लेणी
प्रसिद्ध आहे. या लेणी जुन्नरच्या पश्चिमेस सुमारे ३.५ किमी. अंतरावर पाडळी
गावाजवळील तुळजा टेकडीत खोदली आहेत. हे ठिकाण निरगुडे या गावापासूनही खूप
जवळ आहे. मध्ययुगात केव्हातरी लेणे क्र. ४ मध्ये तुळजाभवानीची मूर्ती स्थापन
केल्याने या संपूर्ण टेकडीला ‘तुळजा टेकडी’ असे संबोधले जाऊ लागले.
तुळजाभवानी |
तुळजा लेणी उत्तराभिमुख असून त्यात एकूण तेरा लेणी आहेत. यांपैकी लेणे क्र. ३ हे चैत्यगृह; तर उर्वरित विहार
व इतर सामान्य खोल्या आहेत. त्यांतील बहुतेकांची प्रवेशद्वारे काळाच्या ओघात
तुटलेली आहेत. याशिवाय तीन अपूर्ण लेणी व दोन पाण्याची टाकी या लेणी समूहात खोदली
आहेत. या लेण्यांत आजतागायत एकही शिलालेख आढळलेला नाही.
लेणे क्र. १ सामान्य खोली आहे. लेणे क्र. २ एक विहार असून आत चौरस मंडप आहे. आतील डावीकडील व मागील भिंतीत प्रत्येकी दोन व उजवीत एक अशा एकूण पाच खोल्या बौद्ध-भिक्षूंच्या निवासासाठी खोदलेल्या आहेत.
लेणे क्र. ३ हे एक वर्तुळाकार चैत्यगृह
असून या समूहातील वैशिष्ठ्यपूर्ण लेणे आहे. त्याचा व्यास ८.२३ मी. असून जमिनीपासून
छतापर्यंतची उंची ७.६२. मी. आहे. या लेण्याच्या मध्यभागी २.५९ मी. व्यास व ३ मी.
उंची असलेला साधा स्तूप आहे. स्तूपाचा खालील भाग (१.३२ मी. उंच) पिंपासारखा व वरील
भाग म्हणजेच ‘अंड’ (१.६७ मी. उंच) घुमटाकृती आहे. घुमटाच्या वर हर्मिका तसेच चौरस
खाच होती, ती आता नष्ट झालेली आहे.
तुळजा लेणी |
स्तूपाच्या भोवती साधे बारा अष्टकोनी स्तंभ (प्रत्येकी उंची ३.३५ मी.) असून त्यांचा खालचा भाग रुंद व वरती थोड्या प्रमाणात निमुळता होत गेलेला आहे. त्यामुळे हे स्तंभ किंचितसे आतल्या बाजूला कललेले दिसतात. विशेष म्हणजे या स्तंभांना स्तंभपाद व स्तंभशीर्ष नाहीत. स्तंभांच्या भोवती वर्तुळाकार प्रदक्षिणापथ (१.०७ मी. रुंद) आहे.
स्तूपाच्या वर घुमटाकार छत असून, त्यावर प्रदक्षिणेच्या छतावर लेणे कोरले
त्यावेळी लाकडी फासळ्या (तुळया) बसविल्या होत्या. तसेच छतावर व बाजूच्या भिंतींवर
मातीचा गिलावा लावून त्यावर रंगीत चित्रे काढली होती. एका उभ्या स्त्रीचे चित्र
आणि अस्पष्टपणे दिसून येणारी पुष्पनक्षी अजिंठा येथील लेणे क्र. १० मधील
चित्रांच्या समकालीन असावी असे दिसून येते. अष्टकोनी स्तंभांवरही चित्रे काढण्यात
आली होती. लेण्याचा दर्शनी भाग अस्तित्त्वात नसल्याने त्याचे संपूर्ण विधान ओळखणे
कठीण आहे. या चैत्यगृहाच्या स्तूपासमोर इतर चैत्यगृहात आढळतो तसा आयताकार सभामंडप
नसावा असे दिसते. परंतु चैत्यगृहाला दरवाजा असल्याच्या खुणा येथे आढळतात.
चैत्याचा गोल आकार व वर्तुळात मांडणी केलेले स्तंभ असे हे पश्चिम भारतातील एकमेव चैत्यगृह आहे. सुरेश जाधव यांनी तुळजा
लेणे क्र. तीनशी पितळखोरा लेणे क्र. ३, अजिंठा लेणे क्र. १०, भाजा व कोंडाणे येथील
चैत्यगृहांचा तौलनिक अभ्यास करून तुळजा लेणे क्र. तीनचा काळ इ.स.पू. सुमारे ६५-५३
ठरविला आहे. तसेच स्थापत्यशास्त्रीय वैशिष्ट्यांवरून हे चैत्यगृह दख्खनमधील
प्रारंभीच्या लेण्यांपैकी एक असावे, असे दिसते. एस. नागराजू यांच्या मते, तुळजा
लेणी-समूहातील लेणे क्र. १, ६, ७ व १३ विहारांच्या स्थापत्यविकासाच्या पहिल्या
टप्प्यातील उदाहरणे असून इ.स.पू. ३०० ते २५० या दरम्यान खोदली गेली असावीत.
लेणे क्र. ४ लहानसे विहार असून त्याचा दर्शनी भाग
तुटला आहे. डावीकडील मागील बाजूस दोन खोल्या असून एकीस आधुनिक लाकडी चौकट बसविली आहे आणि बाजूच्या खोलीत तुळजाभवानीची स्थापना केली आहे.
लेणे क्र. ५ ते १२ यांचा
दर्शनी भाग संपूर्णपणे तुटलेला आहे. लेणे क्र. ८ ते १२ पर्यंत
कडयाच्या वरच्या बाजूस काही कलाकुसर व थोडीबहुत शिल्पे शिल्लक राहिली आहेत. त्यांत वेलबुट्टी, वेदिका, चैत्यकमानी इ. सुबकपणे
कोरलेल्या दिसतात. शिल्पात स्तूपाची पूजा करणारे भक्त, युगल व उडता किन्नर
किंवा गंधर्व दिसतात. किन्नराचा कमरेवरील भाग मानवी असून त्याने तुरेदार फेटा
परिधान केला आहे. त्याचे पाय पक्ष्याचे असून त्याला मोरपिसारा आहे. या कलाकुसरीचे व शिल्पांचे साम्य मानमोडी टेकडीवरील
भूतलेणी समूहातील
शिल्पांशी मिळते-जुळते आहे.
लेणे
क्र. १३ हे या गटातील
शेवटचे लेणे असून बऱ्याच पायऱ्या चढून गेल्यानंतर लागते. याचाही दर्शनी भाग तुटलेला असून आतील चौरस मंडपात बाजूच्या व मागील भिंतीत
खालच्या बाजूस दगडी बाक कोरलेले आहेत. याचा बैठक किंवा सभागृहासाठी उपयोग
केला जात असावा. अलीकडेच तुळजा
लेणींच्या पश्चिमेस साफ-सफाईचे काम चालू असताना अजून काही खोल्या आढळून आल्या
आहेत.
मारुती मंदिर (१९.१८९९४४, ७३.८२१७४५)
निरगुडे गावाच्या मध्यभागी उत्तराभिमुख असे मारुतीचे मंदिर आहे. कला-स्थापत्याच्या
दृष्टीने ते अत्यंत देखणे आहे. संपूर्ण मंदिरावर नक्षीकाम व शिल्पे साकारलेली
दिसतात. मंदिर प्राकार-भिंतीने बंधिस्थ असून त्यास उत्तरेकडून छोटेशे प्रवेशद्वार
आहे. प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर मंदिराची संपूर्ण वास्तू पाहता येते. सभामंडप व
गर्भगृह अशी या मंदिराची सर्वसाधारण रचना आहे. मंदिरासमोर एक दीपमाळ उभी आहे.
मंदिरावरील शिखराचा भाग सोडल्यास संपूर्ण मंदिर हे पाषाणात बांधले आहे. शिखराचा
भाग विटांनी बांधलेला दिसतो.
![]() |
मारुती मंदिर, निरगुडे |
![]() |
मारुती मंदिराचा तलविन्यास, निरगुडे |
सभामंडप
मारुती मंदिराचा सभामंडप बाहेरून ७६२ सेमी लांब x ७६७ सेमी रुंद आहे, तसेच आतल्या बाजूने हा ५९६ सेमी लांब व ५८९ सेमी रुंद आहे. संपूर्ण सभामंडप व गर्भगृह उंच अशा पीठावर उभे आहेत. या उप-पीठावर काही ठिकाणी पुष्पाकृती, व्याळ व गाय यांचे मुखौटे लावण्यात आले आहेत. या सभामंडपाला पूर्व-पश्चिम व उत्तर दिशांना मिळून तीन प्रवेशद्वारे आहेत. मुख्य प्रवेशद्वार हे उत्तरेला आहे.
![]() |
गायमुख |
![]() |
व्याळ |
![]() |
सभामंडप |
सभामंडपाची द्वारे
उत्तरेकडील द्वार सुंदर अशा नक्षीकामाने सजवलेले आहे. द्वारावर दोन स्तंभ
कोरले आहेत. त्यांच्या वरच्या बाजूला लोंबकळत असलेल्या घंटा कोरल्या आहेत. खालच्या
बाजूला द्वारपाल उभे आहेत. त्यांच्या हातात कट्यार, भाले किंवा दंड दिसत आहेत. या द्वाराच्या ललाटपट्टीवर गणेशाचे
शिल्प आहे. या ललाटपट्टीच्या वर एक सुंदर असा मराठी शिलालेख कोरलेला आहे. दरवाज्याच्या
उदुम्बरावर दोन कीर्तिमुख व मध्यभागी पुष्पनक्षी कोरली आहे. या द्वाराच्या दोन्ही
बाजूंना दोन अतिरिक्त अर्धस्तंभ पहावयास मिळतात. या द्वारासमोर एक नंदी शिल्प
दिसून येते. तसेच द्वारातून आत येण्यास पायऱ्यांची रचना पहावयास मिळते.
![]() |
नंदी |
![]() |
उत्तरेकडील द्वार |
![]() |
द्वारपाल |
![]() |
द्वारपाल |
![]() |
उदुम्बर |
![]() |
गणेश |
![]() |
सभामंडपाचे पश्चिमेकडील द्वार |
![]() |
सभामंडपाचे पश्चिमेकडील द्वार |
![]() |
गणेश |
सभामंडपाच्या पूर्वेकडील द्वार हे एकंदरीत पश्चिमेकडील द्वारासारखेच दिसते. फरक फक्त एव्हढा आहे की या द्वाराचा उपयोग बाहेर किंवा आत येण्यासाठी होत नसावा. कारण या द्वारासमोर पायऱ्यांची रचना दिसून येत नाही. या द्वाराच्या ललाट-पट्टीवर गणेश शिल्पाऐवजी गोल पुष्पाकृती कोरली आहे. कदाचित या द्वाराचा उपयोग भक्तांना सभामंडपात येण्यासाठी होत नसावा म्हणून ललाटपट्टीवर देखील गणेश शिल्पाऐवजी केवळ एक पुष्पाकृती कोरली आहे. या द्वाराच्या उंबरठ्यावर मानवी-मुख कोरले आहे.
![]() |
सभामंडपाचे पूर्वेकडील द्वार |
![]() |
कूर्म-शिल्प |
![]() |
गोल पुष्पाकृती |
![]() |
गजशिल्प |
![]() |
गजशिल्प |
![]() |
वितान |
![]() |
सभामंडपातील कमान |
गर्भगृह
मारुती मंदिराचे गर्भगृह आकर्षक आहे. गर्भगृहाची बाहेरून लांबी ४५८ सेमी, तर रुंदी ६०८ सेमी आहे. हे मोजमाप आतून ३४९ सेमी लांब व ३४८ सेमी रुंद असे आहे. मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करण्यासाठी नक्षीकामाने नटलेले एक सुंदर प्रवेशद्वार आहे. यास पुष्प व पाने असलेल्या दोन द्वारशाखा आहेत. यांच्या दोन्ही बाजूंना दोन अर्धस्तंभ आहेत. यापलीकडे दोन्ही बाजूंना दोन द्वारपाल कोरले आहेत. ललाट-पट्टीवर गणेश शिल्प आहे. तर उदुम्बरावर एक मानवी मुख कोरलेले दिसते.
![]() |
मारुती मंदिराच्या गर्भगृहाचे प्रवेशद्वार |
गणेशपट्टीच्या वर असलेल्या कमानीत वरच्या बाजूला एक छोटा लेख कोरलेला आहे. कमानीच्या वरती दोन पुष्पाकृती असून मध्यभागी कीर्तिमुख आहे. या कीर्तीमुखाच्या वर अजून एक विस्तीर्ण असा लेख लावलेला दिसतो.
गर्भगृहात मध्यभागी कोरीव लाकडी मेघडंबरी आहे. ती इ.स. १८८० साली बसविण्यात
आली असावी, हे त्यावर
कोरलेल्या लेखावरून समजते. या मेघडंबरीत मध्यभागी चपेटदान मुद्रेतील मारुतीची
सुंदर अशी शेंदूरचर्चित मूर्ती बसविण्यात आली आहे. मारुतीच्या मूर्तीजवळ एक
शिवलिंग व गणेश शिल्प ही दिसून येते. गर्भगृहाचे वितान अत्यंत आकर्षक व कोरीवकाम
केलेले आहे.
![]() |
गर्भगृहाचे वितान |
![]() |
गर्भगृहातील मारुती |
![]() |
कोरीव लाकडी मेघडंबरी |
![]() |
कोरीव लाकडी मेघडंबरी |
![]() |
कोरीव लाकडी मेघडंबरी |
![]() |
कोरीव लाकडी मेघडंबरी |
![]() |
गर्भगृहातील मारुती मूर्ती |
मंदिराचे बाह्यांग
मंदिराचे बाह्यांग एकंदरीत सपाट असले तरी काही ठिकाणी सुंदर नक्षीकाम केलेले दिसून येते. बाह्यांगाच्या खालच्या बाजूला व अन्य ठिकाणी अर्ध-पुष्पाकृतीयुक्त नक्षीकाम दिसते.
![]() |
मंदिराचे बाह्यांग |
![]() |
मंदिराच्या बाह्यांगावरील नक्षीकाम |
![]() |
मंदिराच्या बाह्यांगावरील नक्षीकाम |
![]() |
मंदिराच्या बाह्यांगावरील नक्षीकाम |
![]() |
मंदिराच्या बाह्यांगावरील नक्षीकाम |
![]() |
मंदिराच्या बाह्यांगावरील नक्षीकाम |
![]() |
मंदिराच्या बाह्यांगावरील नक्षीकाम |
गर्भगृहाच्या बाह्यांगावर तिन्ही बाजूंना कोरीव नक्षीयुक्त झरोखे/खिडक्या आहेत. यांपैकी गर्भगृहाच्या मागील बाजूला असणाऱ्या जाळीदार खिडकीवर पक्षी कोरले असून वरती वेणूगोपालाचे एक लहान शिल्प आहे. मंदिराच्या शिखराचा भाग व सभामंडप-गर्भगृह यांच्यामध्ये असणाऱ्या भागावर बिल्वपत्रांची ओळ आहे.
![]() |
कोरीव नक्षीयुक्त झरोखा/खिडकी |
![]() |
कोरीव नक्षीयुक्त झरोखा/खिडकी |
![]() |
कोरीव नक्षीयुक्त झरोखा/खिडकी |
मंदिराचे शिखर
मारुती मंदिराचे शिखर अप्रतिम असून वेगळ्याच धाटणीचे आहे. गर्भगृहावर असलेल्या शिखराच्या रचनेमध्ये मध्यभागी एक मोठा मुख्य (dome) भाग व त्याच्या सभोवताली चारी बाजूंनी लघुशिखरांची लहान ओळ आहे. तर मागील भागात दोन कोपऱ्यांत बंगाली छप्परासारखी स्वतंत्र परंतु लहान शिखरे आहेत.
![]() |
मारुती मंदिराचे शिखर |
![]() |
मारुती मंदिराचे शिखर |
![]() |
मारुती मंदिराचे शिखर |
मुख्य शिखराला असणाऱ्या लघुशिखरासदृश्य भागात दशावतार व अन्य देवदेवतांच्या काही प्रतिमा बसविण्यात आल्या आहेत. यांमध्ये मत्स्यावतार, कूर्मावतार, वराहवतार, विदारण नरसिंह, वामनावतार, वेणूगोपाल, श्रीराम, गणेश, विठ्ठल, सरस्वती इ. प्रतिमा आहेत. या प्रतिमा मूळ मंदिरासमवेत बसविण्यात आल्या असाव्यात का? हे मात्र निश्चितपणे सांगता येत नाही. कारण या भागावर संपूर्णपणे रंग-रंगोटी केली गेली आहे.
सभामंडपावर, मध्यभागी देखील एक शिखर आहे. या शिखराच्या चारी बाजूंना चार लघु शिखरे आहेत. येथे दोन साधुंशिवाय अन्य प्रतिमा दिसत नाहीत. परंतु समोरील दोन लघु-शिखरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज व संत रामदास यांच्या प्रतिमा दिसतात. तसेच या दोघांच्या मध्ये खुर्चीवर बसलेली एक व्यक्ती व आजूबाजूला हात जोडून बसलेल्या दोन अन्य व्यक्ती दिसत आहेत. खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीने डोक्यावर पुणेरी पगडी परिधान केली आहे. हे शिल्प सटाणा जिल्हा धुळे येथील देव मामलेदार यांचे आहे. ब्रिटीश कालखंडात त्यांच्या न्यायदानाची कीर्ती सर्वत्र पसरली होती. हे पद आजच्या तहसीलदाराप्रमाणेच मानले जाते. आजही सटाणा येथे त्यांची खुर्ची, कपडे व इतर सामान ठेवलेले आहे. तेथील तहसीलदार त्यांना आपला आदर्श मानून व दररोज पूजा करून आपल्या कामकाजाची सुरुवात करतात. अशा प्रकारचे हे आगळे-वेगळे शिल्प निरगुडे गावातील मारुती मंदिरावर पहावयास मिळते.
![]() |
मंदिरावरील शिल्पे |
मंदिराच्या आवारातील शिल्पे व वास्तू: मंदिराच्या आवारात गजलक्ष्मी, गणेश, व वीरपुरुषाचे शिल्प दिसते. यांपैकी गजलक्ष्मीच्या शिल्पात, ती दोन गजासमवेत आहे. ते गज तिला अभिषेक घालत आहेत. ही मूर्ती मारुती मंदिरांपेक्षाही जुनी असावी, असे वाटते. वीरपुरुषाच्या हातात तलवार व ढाल दिसत आहे. याशिवाय मंदिराच्या मागे एक तुळशी-वृंदावन आहे. यावर गणेश व कुऱ्हाड-ढाल धारण केलेल्या एका व्यक्तीची प्रतिमा आहे. या वृन्दावनाजवळ अज्ञात व्यक्तीची समाधी आहे. या गावाच्या हद्दीतील एका आमराईत देखील वीरपुरुषाचे शिल्प व काही समाध्या पहावयास मिळतात.
![]() |
गजलक्ष्मी |
![]() |
वीरपुरुष |
![]() |
गणेश |
![]() |
वीरपुरुष |
मारुती मंदिरातील शिलालेख
मारुती मंदिर व परिसरात असे एकूण पाच शिलालेख कोरण्यात आले आहेत. या सर्व
शिलालेखांचे वाचन सर्वप्रथम डेक्कन कॉलेज पुणे येथील डॉ. गिरीश मांडके यांनी केले.
त्यांनी २०१४ साली या मंदिराला भेट दिली, तेंव्हा या मंदिराचे यथोचित निरीक्षण त्यांच्याकडून
निश्चितपणे झाले असणार. शिवाय त्यांनी अन्य शिलालेख देखील वाचले असणार. शिलालेख
क्र. १ चे पुढे दिलेले संपूर्ण वाचन
त्यांनी केलेल्या वाचनावरच आधारित आहे.
शिलालेख क्र. १. (मंदिरातील गर्भगृहाच्या द्वारावरील
शिलालेख)
मारुती मंदिराला असणाऱ्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर संस्कृत भाषेतील व
देवनागरी लिपीतील एक शिलालेख कोरला आहे. हा लेख ६ ओळींचा असून स्पष्ट व उठावदार
पद्धतीचा आहे. या शिलालेखाचे वाचन सोपे असले तरी अर्थ काढणे तितके सोपे नाही. सदर शिलालेख
वाचनाचे व त्याचा अर्थ काढण्याचे संपूर्ण श्रेय हे डॉ. मांडके यांनाच जाते.
शिलालेखाचे वाचन खालीलप्रमाणे आहे.
![]() |
मंदिरातील गर्भगृहाच्या द्वारावरील शिलालेख |
शिलालेखाचे वाचन:
१. ग्रामाणां त्रितयं
पुरातनमिदं मीनापगातीरगं वछीसावरसंज्ञकं वटपुरं तत्राद्दी(धि)कारद्वये
२. वारुण्यां शिवपर्वतस्य
निकटे कालं च कौंतीपुरं तस्मिन्केवलमेव लेखनमनुष्यास्ते चिरं भूतिदं
३. प्राचीनार्जित भूरिपुण्यजनिताद्रुद्रप्रसादादयं जातः सर्वसुखस यादव मंहादेवु:
कुलेदीपकः
४. इत्थं (त्छं) श्रीहनुमत्पदाब्ज भजनप्राप्ताश्रयः श्रीभुजा
येनाकारि भुजार्जितेन वसुना श्रीमारुतेरालयं
५. शाकेकारि नृपौर्मिते प्रभवनामाब्दे तपस्ये सिते पक्षे
खेंदुतिथौ शनाव दतिभे सौभाग्ययुक्तैतिले
६. एवं सर्वसुशोभने कमलिनीनाथे खमध्यस्थिते होरायां
शशिजस्य पुर्णमभवद्वातात्मजस्यालयं
अर्थ: मीना नदीच्या तीरावर तीन गावांचा समूह आहे. दोन अधिकार असलेले, वछीसावर संज्ञा असलेले वटपूर, पश्चिमेला शिवपर्वताच्या जवळ
असलेले काल आणि केवळ लेखनकर्मावर उपजीविका करणारी माणसे जेथे राहतात ते कौतीपूर.
प्राचीन काळी पुष्कळ पुण्य मिळविल्याने ज्याने रुद्राची प्रसन्नता झाल्यामुळे
जन्माला आलेला यादव महादेव कुलदीपक झाला. अशाप्रकारे, श्री हनुमानाच्या पदकमलाच्या भक्तीमुळे
ज्याला आश्रय मिळाला आणि त्यामुळे जो वैभव भोगतोय, त्याने हे
मारुतीचे देवालय उभारले.
शके १६६४ (नृप-१६, अरि-षड् रिपू-६, क-ब्रह्मा-४) फाल्गुन (तपस्या) महिना, प्रभवनाम संवत्सर, शुक्ल पक्ष (सित पक्ष),
दशमी (ख-आकाश-०, इंदु-चंद्र-१), शनवार, सौभाग्य तैतिल, या शुभमूहूर्तावर सूर्य
मध्यानी असताना (खमध्यस्थिते), बुधाचा होरा असताना वायूपुत्राचे देऊळ बांधून पूर्ण
केले. शिलालेखात दिल्याप्रमाणे शके १६६४ ही तारीख इंग्रजीत इ.स. १७४२ अशी येते.
शिलालेख क्र. २. (गुढमंडपाच्या मुख्य दरवाजावरील लेख)
या मंदिरातील दुसरा महत्त्वाचा शिलालेख हा गूढमंडप किंवा सभामंडपाच्या
प्रवेशद्वाराच्या वर कोरलेला आहे. हा लेख १२ ओळींचा असून, तो मराठी आणि देवनागरी
लिपीत आहे. तो उठावदार पद्धतीत असला तरी, बऱ्याच ठिकाणी अस्पष्ट आहे. लेखातील
अक्षरे अगदीच लहान असल्याने वरचेवर लेखाचे वाचन अस्पष्ट होत चालले आहे. तसेच सततच्या
उन, वारा, पाऊस यांच्या माऱ्यामुळे तो अनेक
ठिकाणी पुसटसा झाला आहे. याचे वाचनही
यापूर्वी डॉ. मांडके सरांनी केलेलेच असणार. शिलालेख पुसट होत चालल्याने त्याची कुठेतरी
लवकरात लवकर नोंद होणे आवश्यक होते. म्हणून जेवढे वाचन शक्य झाले आहे, तेव्हढे
येथे देण्याचा प्रयत्न केला आहे. या लेखातील पहिल्या काही ओळी ह्या स्पष्ट
असल्याने शिलालेख बसविण्यात आलेली तारीख आपणास समजते.
![]() |
गुढमंडपाच्या मुख्य दरवाजावरील लेख |
शिलालेखाचे वाचन:
१. श्री गजानन श्री शके
२. १६६८ नृप [क्षय] नाम संव
३. छरे मार्गेश्वर शुध
४. ****वासर प्राा श्री रामदुत
५. हनुमत प्रहार सीधारुस्यावतार
६. सीव शंकर दीन (त) ** तो कुळदेव
७. ना मा द नंदन ***सिपकर**
येतया
८. *******नाममुळे ** श्रामपुरा
९. ******नृप मतर मौज ग्रामे दोनी निर गु
१०. ********त मातुलिंग तर फे
११. ******सावसरे व ३ हाणिले गाव चे असति
१२. जोसी कुळकर्णी चे**
शिलालेखाचा अर्थ: शके १६६८, नृप[क्षय]नाम संवत्सरे मार्गशीष शुद्ध महिन्यात
म्हणजेच १–१४ नोव्हेंबर, इ.स. १७४६ ला रामदूत हनुमानाच्या मंदिराचा सभामंडप बांधला
(असावा). अशा आशयाचा मजकूर किंवा अर्थ या लेखातून काढता येतो.
शिलालेख क्र. ३ गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील लेख
हा लेख गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर खोदला आहे. शिलालेख स्पष्ट असून देवनागरी
लिपीत आहे. तो चार ओळींचा आहे. सदर लेखात प्रभु रामचंद्रांचा उल्लेख आहे. अशा
प्रकारचा शिलालेख हा दुर्मिळ प्रकारातील आहे. या लेखात तो केंव्हा बसविण्यात आला, त्याची तारीख नसली तरी त्याच्या अक्षरांची
वळणे ही शिलालेख क्र. १ प्रमाणे असल्याने हा लेखही साधारणपणे याच सुमारास म्हणजे
इ.स. १७४४ साली कोरण्यात आला असावा, असे दिसते.
![]() |
गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील दुसरा लेख |
शिलालेखाचे वाचन:
१.
श्री राम जय
२.
राम जय जय
३.
राम रघुपती
४.
राजा राम I
शिलालेख क्र. ४. (गर्भगृहातील लाकडी मेघडंबरीवर असणारा लेख)
मारुती मंदिराच्या गर्भगृहात असणाऱ्या लाकडी मेघडंबरीवर दोन्ही बाजूंना काही
अक्षरे कोरली आहेत. त्यांपैकी मेघडंबरीच्या उजव्या बाजूला ‘माघ शुद्ध ५’ ही अक्षरे
असून डाव्या बाजूला ‘शके १८०२’
हे शक सन दिलेले आहे. हा लेख देवनागरी लिपीत आहे.
![]() |
गर्भगृहातील लाकडी मेघडंबरीवर असणारा लेख |
![]() |
गर्भगृहातील लाकडी मेघडंबरीवर असणारा लेख |
भाग १.: माघ शूध्धै ५
भाग २: शके १८०२
अर्थ: सदर मेघडंबरी माघ शुद्ध ५ शके १८०२ म्हणजेच रविवार, १५ फेब्रुवारी इ.स. १८८० साली
बसविण्यात आली असावी. यावेळी प्रमाथी संवत्सर सुरु होते.
शिलालेख क्र. ५. मारुती मंदिर संकुलाच्या प्रवेशद्वारावरील
लेख
मारुती मंदिराच्या प्राकारभिंतीला असणाऱ्या प्रवेशद्वाराजवळ काही अक्षरे
कोरण्यात आली आहेत. ती सर्व अक्षरे/शब्द एकाच लेखाचे भाग आहेत. असे त्याच्या
वाचनावरून लक्षात येते. हा लेख तीन भागात असून त्यातील काही अक्षरे पुसट झाली
आहेत.
![]() |
मारुती मंदिर संकुलाचे प्रवेशद्वारावर |
![]() |
मारुती मंदिर संकुलाच्या प्रवेशद्वारावरील शिलालेख |
![]() | |
|
भाग पहिला :
श्री
हनुमान
प्रसन्न
जिर्णोद्धार
भाग दुसरा:
भाद्रपद
शुद्ध १
भाग तिसरा
शके १८**
अर्थ: या शिलालेखांवरून असे समजते की भाद्रपद शुद्ध १, शके १८०० (?) रोजी
हनुमान मंदिराच्या या भागाचा जीर्णोद्धार केला गेला.
कथा-दंतकथा/ सण/ उत्सव
निरगुडे येथील मारुती मंदिराशी संबंधित काही कथा व प्रथा
येथे प्रचलित आहेत. तसेच काही सण-समारंभ व उत्सव येथे साजरे केले जातात. मारुती
मंदिरातील मूर्तीवर वर्षातून दोनदा सूर्यकिरणे पडतात. महाशिवरात्रीच्या दिवशी
सकाळी ८:३० ते १० या दरम्यान हा किरणोत्सव पहावयास मिळतो. ही सूर्यकिरणे
पूर्वेकडून मंदिरात प्रवेश करतात. तर हनुमान जयंतीच्या दिवशी सायंकाळी पावणे सहाच्या
दरम्यान ही किरणे पश्चिमेकडून मंदिरात प्रवेश करतात. हा अद्भुत किरणोत्सव पाहण्यास
अनेक भक्त येथे येत असतात.
श्रावण महिन्याच्या प्रत्येक शनिवारी मारुतीरायचा छबीना काढून
पालखीची मिरवणूक काढली जाते. हा उत्सव किंवा धार्मिक विधी रात्री ९ ते १२ या
दरम्यान साजरा केला जातो. यावेळी पालखी समवेत मारुती मंदिराला पाच फेऱ्या मारल्या
जातात. ही परंपरा फार पूर्वीपासून येथे सुरु आहे.
चैत्र शुद्ध एकादशी ते हनुमान जयंतीपर्यंत, या पाच दिवसांत
एक तासाचे नारदीय कीर्तन असते. या कीर्तनाचा खर्च वगैरे श्री. निरगुडकर व कुटुंबीय
करतात. या मंदिराचे पुजारी म्हणून श्री.
सुर्यकुमार शंकरराव निरगुडकर व त्यांचे तीन बंधू कामकाज पाहतात. हे ब्राह्मण
कुटुंबीय पूर्वीपासूनच या मंदिराची देखरेख करत आले आहे. आजही यांच्या मार्फत
पुजाऱ्याची नियुक्ती केली जाते. यांच्या मार्फत देवाची पूजा, नैवद्य व आरती पार पाडली जाते.
भाद्रपद शुद्ध आमावस्या (बैल-पोळा) या सणादिवशी मारुती मंदिराच्या
समोरील मुख्य दरवाजातून गावातील बैल मंदिर संकुलात नेले जातात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे
सु. १ मीटर असणाऱ्या या दरवाजातून सर्व बैल व्यवस्थितपणे आतमध्ये प्रविष्ठ होतात.
प्राकार-भिंतीतून आत आल्यानंतर बैलांकडून मंदिराची प्रदक्षिणा करवून घेतली जाते. यानंतर
पुन्हा याच दरवाज्यातून बैलांना बाहेर काढले जाते.
निष्कर्ष व चर्चा
एकंदरीत मारुती मंदिर हे वास्तुकलेच्या दृष्टीने एक महत्त्वाचे मंदिर आहे. या
मंदिराच्या गर्भगृहाचे बांधकाम येथील शिलालेखामध्ये नमूद केल्याप्रमाणे इ.स. १७४४,
तर सभामंडपाचे काम इ.स. १७४८ साली झाले असावे. मंदिराला असणारी प्राकारभिंत व
प्रवेशद्वार यांचे काम किंवा जीर्णोद्धार हा १९व्या शतकात झाला असल्याचे येथील
शिलालेखांवरून दिसून येते. तरीही यातील काही मजकूर अस्पष्ट असल्याने तारखेच्या
बाबतीत थोड्या-फार मर्यादा येतात. मारुतीची स्वतंत्र उपासना ही फार पूर्वीच प्रचलित होती. परंतु, त्यांची आद्य मंदिरे ही खूप कमी आहेत. सतराव्या
शतकात संत रामदासांनी मारुतीची काही मंदिरे बांधल्याचा संदर्भ मिळतो. परंतु त्या
मंदिरांचे स्थापत्य साधारण होते. मराठा-पेशवे काळात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी
मारुती मंदिरे बांधण्यात आली. पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यातील मुखई व
तळेगाव-ढमढेरे, वाघोली येथील मारुती मंदिर, गणेगाव खालसा
येथील रोकडोबा (हनुमान मंदिर), पुण्यातील, नारायणगाव येथील मारुती मंदिर इ. मंदिरे
ही मारुतीची आहेत. परंतु या सर्व मंदिरांमध्ये निरगुडे येथील मंदिर सर्वात आदीचे आणि
भव्य म्हणता येईल.
![]() |
तुळशी वृंदावन |
![]() |
निरगुडे यांचा वाडा |
![]() |
मंदिर परिसरातील समाधी |
![]() |
दीपमाळ |
संदर्भ:
·
जाधव, सुरेश वसंत, जुन्नर-शिवनेरी परिसर,
पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये विभाग,
महाराष्ट्र शासन, मुंबई, १९८२.
· जामखेडकर, अ. प्र. (संपा.) महाराष्ट्र :
इतिहास-प्राचीन काळ (खंड-१ भाग-२) स्थापत्य व कला, दर्शनिका विभाग, सांस्कृतिक
कार्य विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई, २००२.
·
Jadhav, Suresh V., Rock-cut Cave Temples at
Junnar-An Integrated Study, Ph.D. A thesis submitted to the University of
Poona, 1980.
· Nagraju, S., Buddhist Architecture of Western
India, Delhi, 1981.
· Suresh Vasant, Tulja Leni and Kondivte
Chaityagrihas: A Structural Analysis, Ars Orientalis, Michigan, 2000.
-डॉ. गिरीश मांडके यांच्याकडून प्राप्त झालेली माहिती.
· - निरगुडे गावातील ग्रामस्थांकडून प्राप्त झालेली
माहिती.
· -सर्वेक्षणातून समोर आलेली माहिती.
![]() |
मारुती मंदिर परिसरातील समाधी मंदिर |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा