आधुनिक जीवनशैलीमुळे आरोग्यसंबंधीच्या निर्माण झालेल्या अनेक समस्या तसेच दिवसेंदिवस वाढत चाललेला ताण-तणाव, यांवरती उपाय म्हणून योगसाधनेकडे जग मोठया आशेने पाहत आहे. दैनंदिन जीवनात आरोग्य विषयीचे महत्त्व आपल्या पूर्वजांनी फार पूर्वीपासूनच ओळखले होते. यासाठी त्यांनी योगसाधनेला आपलेसे केले. अनेक ऋषी-मुनींनी योगविद्येच्या बळावर आपले व इतरांचे जीवन आरोग्यदायी बनविण्याचा प्रयत्न केला. जागो-जागी असणारे सांप्रदायिक मठ तसेच गुहा-कंदरांमध्ये ही साधना चालत असे. वरचेवर यात नवनवीन प्रयोग झाल्याने ही विद्या भरभराटीस आली. कित्येक प्राचीन मंदिरांवरती शिल्पकलेच्या रुपात आपल्याला याचे पुरावे मिळतात.
आपला हा प्राचीन वारसा अनेक ग्रंथ व मौखिक परंपरेने तर जपला गेला आहेच, परंतु हा एवढया पुरताच मर्यादित न राहता शिल्पकलेच्या माध्यमातूनही जोपासण्याचा प्रयत्न झाला. योगविषयीची अनेक आसने, मुद्रा, प्राणायामांचे प्रकार शिल्पबद्ध केले गेले. पुणे परिसरात व जिल्ह्यात इतरत्र अशा प्रकारची शिल्पे व अवशेष आपल्याला पहावयास मिळतात.
आज पुणे शहरातील ‘अय्यंगार योग संस्था’ तसेच लोणावळ्यातील ‘कैवल्यधाम’ व ‘लोणावळा योग संस्था’ योगविद्येच्या प्रचार व प्रसारासाठी कार्यरत असल्या तरी, ही परंपरा पुण्यासाठी नवीन नाही. इसवीसन १७५४ ते १७७० या काळात सोमवार पेठेत बांधल्या गेलेल्या त्रिशुंड गणपती मंदिर व मठात योगविद्येची साधना केली जात असे. साधकांना योग्य प्रकारे साधना करता यावी म्हणून विशिष्ट खोल्यांची रचनाही येथे केली गेली होती. येथे ‘धुम्रपान’ नावाची एक विशिष्ट साधना होत असे. त्यामध्ये हठयोगाचे साधक स्वतःला छताला उलटे टांगून घेत व खाली निखाऱ्यामध्ये काही औषधी वनस्पती टाकल्या जात व त्यापासून निघालेला धूर ते नाकाद्वारे घेत असत. यामध्ये संभवतः दशनामी गोसावी पंथातील साधक हठयोगाची साधना करीत. येथे काही योगसाधकांच्या समाध्याही आहेत. अशा या योग-स्मारकाचे संवर्धन करून त्याचा विकास करणे अगत्याचे आहे.
पुण्यापासून साधारणतः ५४ किमी अंतरावर पिंपरी-दुमाला नावाचे गाव आहे. येथील सोमेश्वर मंदिरावर कुंडलिनी योग विषयीचे महत्त्व सांगणारे दुर्मिळ शिल्प आहे. सुमारे सातशे वर्षांपूर्वी हे मंदिर बांधले गेले. या मंदिराच्या प्रदक्षिणामार्गावर संभवतः आदिनाथांची एक अतिशय दुर्मिळ प्रतिमा आहे. आदिनाथ अर्थात शिव. यामध्ये ते समाधिस्थ योगीच्या रुपात साकारले गेले असून ते पद्मासनात बसले आहेत. त्यांचा उजवा हात ‘सूची’ मुद्रेत आहे. सर्वात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे शिल्पकाराने त्यांच्या डोक्यावर अर्धवट उमललेले कमळ दाखविले आहे. हे कमळ योग साधनेत खूप महत्त्वाचे प्रतिक मानले जाते. मानवी शरीरात कुंडलिनीरूपाने ‘शक्ती’ सुप्त अवस्थेत असते तसेच मस्तकातील सहस्रारांत शिवाचा निवास असतो. कुंडलिनीचा प्रवास मेरुदंडाजवळील मूलाधार चक्रापासून सुरु होऊन त्यानंतर स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्धाख्य चक्र आणि आज्ञा चक्र अशा सहा चक्रांना ओलांडून सहस्रारांत संपतो. योगी ह्या कुंडलिनीरुपी शक्तीला जागृत करून सुषुम्ना नाडीच्या माध्यमातून शक्ती व शिवाचे मिलन सहस्रारांत घडवून आणतो आणि हे सहस्रार रुपी कमळ उमलले जाते अर्थात योग्यास परमानंदमय समाधी प्राप्त होते. असे हे अनन्यसाधारण शिल्प येथील मंदिरावर कोरण्यात आले आहे. पुणे परिसरात योगसाधनेचा प्रचार-प्रसार किती मोठ्या प्रमाणात झाला होता याचे हे उत्तम उदाहरणच होय. सोमेश्वर मंदिरांवरील या शिल्पांमध्ये नाथ संप्रदायातील इतर हठयोगीही दाखविले आहेत. यामध्ये मत्स्येंद्रनाथ व गोरक्षनाथांची शिल्पे या भागात दुर्मिळच म्हणावी लागतील. योगसाधनेच्या उज्ज्वल परंपरेमध्ये पिंपरी-दुमाला येथील मंदिरावरील हठयोगाच्या महान गुरूंची शिल्पे राष्ट्रीय संपदा ठरावीत अशी आहेत.
कुंडलिनी योग संबंधीचे शिल्प, पिंपरी-दुमाला |
कुंडलिनी योगाचे ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथात भरपूर विवेचन केले आहे. आळंदी येथे इंद्रायणी काठी तर ८४ सिद्धांचा मेळा भरत असे. या सिद्धांपैकी काही सिद्ध हे हठयोगी होते. ज्ञानेश्वरांच्या परंपरेतील नाथ-योग्यांच्या समाध्या आजही ज्ञानेश्वर मंदिर परिसरात पहावयास मिळतात.
पुण्यापासून साधारणतः ५४ किमी अंतरावर प्रसिद्ध असणाऱ्या प्राचिन भुलेश्वर मंदिरातही सिद्धांची बरीच शिल्पे आहेत. त्यांना पद्मासन, सिद्धासन यांसारखी विभिन्न आसने व मुद्रांमध्ये दर्शविले आहे. किंबहुना येथील एक सुंदर शिल्प विशिष्ट अशा द्विपादशिरासनात असून साधकाने यात आपल्या पाठीमागे दोन्ही पाय एकमेकांत अडकविले आहेत.
द्विपादशिरासन/पाशिनी मुद्रा, भुलेश्वर मंदिर |
जुन्नरपासून साधारणतः १० किमी अंतरावरील पारुंडे गावातील ब्रह्मनाथ मंदिराच्या खांबांवरती विविध ध्यान-धारणा व आसनातील अनेक शिल्पे कोरण्यात आली आहेत. उर्ध्व-धनुरासन, गरुडासन, नौकासन, प्रसारित-पादोत्तानासन, गोमुखासन, पाद-पश्चिमोत्तानासन, अनंतासन, अर्ध-मत्स्येन्द्रासन, क्रौंचासन अशा किती तरी आसनांचे प्रकार येथे कोरले गेले आहेत.
पाद-पश्चिमोत्तानासन, ब्रह्मनाथ मंदिर, पारुंडे |
येथूनच पुढे हरिश्चंद्रगडावर प्रसिद्ध योगी चांगदेव यांनी ‘तत्त्वसार’ नावाचा ग्रंथ लिहिला होता. त्यामुळे हा परिसर एकेकाळी योग साधकांच्या गर्दीने फुलून गेलेला असावा असे दिसते. अशा या दर्जेदार वारशामुळे सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रांबरोबरच योगसाधनेच्या परंपरेतही पुणे परिसर व जिल्ह्याचे महत्त्व ठळकपणे दिसून येते.
योग विद्येचे जागतिक महत्त्व ओळखून या स्थळांचे व्यवस्थितरित्या संगोपन व संवर्धन होणे गरजेचे आहे. योगसाधनेच्या परंपरेत आपणासही असा प्राचीन वारसा लाभला आहे, याचा अभिमान सर्वांनी बाळगायला हवा. या अवशेषांचे अस्तित्त्व टिकून राहणे म्हणजे आपले व आपल्या पूर्वजांचे अस्तित्त्व टिकून राहण्यासारखे आहे. हा अनमोल ठेवा नाहिसा होण्याअगोदर त्याची माहिती सर्वदूर पोहोचवून त्याचे महत्त्व जगासमोर मांडणे गरजेचे आहे. संपूर्ण विश्व योगसाधनेला जवळ करीत असताना आपणही या निमित्ताने आपल्या पूर्वजांप्रमाणे योगविद्येला अंगीकारून आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनवायला हवे. आपल्या भारतीय योगपरंपरेचे हे प्राचीन दुर्मिळ पुरावे निश्चितच संपूर्ण जगासाठी मार्गदर्शक व प्रेरक ठरतील व आपल्या पूर्वजांचे महान कार्य शिल्परूपाने बोलू लागतील.