![]() |
लेणे क्र. २, चांभार लेणी, धाराशिव (उस्मानाबाद). |
जिल्ह्याचे
मुख्य ठिकाण असलेले उस्मानाबाद शहर व परिसरात धाराशिव लेणी, हातलाई देवी टेकडी, चांभार
लेणी, कपालेश्वर मंदिर, लाचंदर लेणी, हजरत ख्वाजा शमसुद्दीन गाजी दर्गा इ. स्थळे विशेष
प्रसिद्ध आहेत. यांपैकी चांभार लेणीचे नाव आपल्यापैकी अनेकांनी ऐकले असले तरी, याचे
महत्व व ऐतिहासिकता अजूनही अनेकांना माहित नाही.
तत्कालीन
धाराशिव परिसराचे सर्वप्रथम सखोल सर्वेक्षण जेम्स बर्जेस या एका स्कॉटिश विद्वानाने
१८७५ च्या डिसेंबर महिन्यात केले. ते धाराशिव पंचक्रोशीतील चांभार लेण्यांसह अनेक
ठिकाणी फिरले व विविध स्थळांच्या नोंदी नमूद करून घेतल्या. त्यांनी १८७८ साली लंडन
येथून प्रकाशित झालेल्या ‘द अँटिक्वटीज इन द बिदर अँड औरंगाबाद डिस्ट्रिक्ट्स’ या
आपल्या एका अहवालामध्ये चांभार लेणीची सविस्तर माहिती दिलेली आहे. त्यावेळी त्यांनी
यातील एका लेण्याचा तलविन्यासही बनविला होता.
भोगावती
नदीच्या जवळच डाव्या बाजूला असणाऱ्या एका छोट्याशा टेकडीवर सुमारे दीड हजार
वर्षांपूर्वी उत्तराभिमुख या हिंदू लेणी खोदण्यात आल्या. उस्मानाबाद शहरापासून
दक्षिण-पश्चिमेला वैराग रस्त्याने जाताना या लेण्यांचे दर्शन होते. येथून पुढे
डाव्या बाजूला पायवाटेने लेण्यांपर्यंत पोहोचता येते. वास्तविक पाहता येथे दोन
स्वतंत्र लेणी खोदण्यात आलेली आहेत.
पहिल्या लेण्याच्या समोरील बराचसा भाग कोसळलेला असला तरी काही खोल्या व इतर खोदकाम सुस्थितीत
आहे. लेण्याच्या पश्चिम दिशेला पूर्वाभिमुख द्वारावर नक्षीकाम केलेली एक खोली आहे. याच्या दोन्ही बाजूंना काही आकृती अस्पष्ट
दिसतात.
![]() |
पश्चिमाभिमुख खोली, लेणे क्र. १. चांभार लेणी. |
याच्या वरच्या बाजूला काही शिल्पकामांसाठी आखलेली ओळ दिसते. यांपैकी
उजव्या हाताला फक्त गणेशाचे एक छोटेसे शिल्प कोरण्यात आलेले दिसून येते.
![]() |
गणेश प्रतिमा (खंडित) लेणे क्र.१. (चांभार लेणी)/(सौजन्य: जयराज खोचरे) |
जेम्स बर्जेसच्या
मते हा शिल्पपट मुळात सप्तमातृकांसाठी आखलेला असावा. येथून थोडेशे पूर्वेला अजून
एक खोली आहे. मुळात ती तुलनेने एका मोठ्या खोलीच्या मागे असावी, असे दिसते. या खोलीच्या
द्वाराला तीन सपाट शाखा आहेत. जवळच चार स्तंभयुक्त ओबडधोबड काम दिसते. लेण्यासमोर
पडलेला दगडांचा खच व लेण्याच्या भिंती दरम्यान अजून दोन खोल्या आहेत. त्यांपैकी एकात
थोडेसे खंडित झालेले एक विशाल ‘शिवलिंग’ आहे. यामुळे येथे पूर्वीपासूनच शिवाराधना
होत असावी, असे दिसून येते. या खोल्यांना लागून चार स्तंभयुक्त एक दुसरी खोली आहे.
लेण्याच्या पूर्वेला शेवटी अजून एक मूर्तीविरहित खोली असून ती पश्चिमाभिमुख आहे. या लेण्याच्या समोरील एकूण भाग जवळपास १०० फुट रुंद आहे.
![]() |
शिवलिंग, लेणे क्र. १. धाराशिव. |
या
पहिल्या लेण्यापासून पूर्वेला थोड्याच अंतरावर वरच्या बाजूला, उत्तराभिमुख एक दुसरे हिंदू
लेणे आहे. याची रुंदी २६ ते ३१.७ फुट तर खोली २५ ते २८.६ फुट भरते. या लेण्याची एकही
भिंत सरळ व व्यवस्थितपणे खोदण्यात आलेली दिसत नाही. लेण्याच्या पुढचा भाग दोन अष्टकोनी
खांबांनी युक्त असून दोन शिल्पविरहित अर्धस्तंभ दोन्ही बाजूंना आहेत. सभामंडपात दोन
आडव्या ओळींमध्ये चार-चार असे मिळून एकूण आठ स्तंभ आहेत. यांपैकी मधल्या भागातील
समोरील दोन स्तंभ १६ बाजूंचे, मागील ओळीतील मधले दोन अष्टकोनी, तर सभामंडपाच्या
दोन्ही बाजूंचे चौकोनाकृती आहेत. स्तंभांचे शीर्ष साधारण आहेत.
![]() |
मंडप, लेणे क्र.२, चांभार लेणी, धाराशिव (उस्मानाबाद) |
गर्भगृहाचे द्वार अलंकृत असून दोन्ही बाजूंना अर्धस्तंभ
कोरण्यात आलेले आहेत. हे स्तंभ कर्नाटकातील बदामी लेण्यातील गर्भगृह, तसेच मुंबई जवळील
घारापुरी येथील लेणी क्र. चार येथील प्रवेशद्वारांसारखेच आहेत.
या लेण्याचे गर्भगृह ७.१० x ७.८ फुट असून मधोमध एक ४.५ x २.८ फुटाची वेदी (उंच आसन) आहे.
त्या वेदीच्या मधोमध एक फुटाचे चौकोनाकृती वेज
आहे. या लेण्याचा इतर लेण्यांशी तौलनिक अभ्यास केल्यास हे दुसरे लेणे भगवान विष्णू
किंवा दुर्गा अथवा महालक्ष्मी या देवतांना समर्पित असावे, असे जेम्स बर्जेस
यांचे मत आहे.
![]() |
लेणे क्र.२ चा तलविन्यास (सौजन्य : जेम्स बर्जेस) |
जेम्स
बर्जेसच्या मते चांभार लेणी हिंदू असून, ती सर्वसाधारणपणे सहाव्या शतकाच्या
सुरुवातीस खोदण्यात आली असावीत. या लेण्यांच्या जवळच ‘लाचंदर’ नावाने ओळखल्या
जाणाऱ्या अन्य लेणी असून, भोगावती नदीच्या आजूबाजूला खडकात काही खोदकाम केलेल्या
खोल्या दिसून येतात.
या
चांभार लेण्यांचे स्थान लयन स्थापत्य विकासाच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे. संपूर्ण
भारतात आरंभिक काळात खोदण्यात आलेल्या हिंदू लेण्यांपैकी ही एक असून, येथे
उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वात प्राचीन असे शिवलिंग आहे.
![]() |
लेणे क्र. २ समोरील आवार व सुंदर दृश्य |
या
प्राचीन शैव स्थळाचे संवर्धन व संरक्षण होणे गरजेचे आहे. लेण्यांची स्थिती अत्यंत
शोचनीय असून त्यांच्या जपणुकीची योग्य ती व्यवस्था तात्काळ न केल्यास
महाराष्ट्राच्या प्राचीन वैभवाचा हा मौल्यवान ठेवा नष्ट होण्याची शक्यता आहे. लेण्यांची
दुर्दशा नैसर्गिक आणि मानवी आपत्तीमुळे झाली आहे. हा वैभवशाली वारसा
उस्मानाबादकरांनी व शासनाने जपायला हवा. तसेच या शैव-पीठाचे पुनरुज्जीवन करायला
हवे. सर्वांनी एकत्र येवून उस्मानाबाद शहराचा उज्ज्वल इतिहास जगासमोर मांडण्याची
आवश्यकता निर्माण झालेली आहे. असा हा अनमोल सांस्कृतिक ठेवा भावी पिढी समोर ठेवण्याच्या
आतच नामशेष होवू नये, म्हणून लेणी संवर्धनाचे पवित्र कार्य हाती घ्यायला हवे. आपण सर्वांनी
आपले व आपल्या पूर्वजांचे अस्तित्व टिकवून ठेवल्यास आपल्या उज्ज्वल परंपरेचे खऱ्या
अर्थाने रक्षण होणार आहे.