शुक्रवार, २८ जुलै, २०२३

सांगवी-सांडस येथील मंदिरे व शिलालेख 

पुण्यापासून ४५ किमी अंतरावर भीमानदीकाठी सांगवी-सांडस हे एक छोटेसे गाव आहे. पुणे-नगर रस्ते मार्गावरील वाघोली किंवा कोरेगाव-भिमा मार्गे येथे सहज पोहोचता येते. या गावाजवळ भिमा नदीच्या पलीकडे विठ्ठलवाडी हे दुसरे गाव आहे. ही दोन्ही गावे भिमा व वेळ नद्यांच्या संगमावर वसली आहेत. सांगवी-सांडस येथील विष्णू मंदिरामुळे या गावाला ‘विष्णुपुर’ या नावानेही ओळखले जाते. 


विष्णू, महादेव व गणेश मंदिरे 
विष्णू मंदिर (१८.६१९५१०, ७४.१७३३२५) भिमा नदीकाठी असून या मंदिराच्या डाव्या बाजूला शिव व उजव्या बाजूला गणेशाची मंदिरे आहेत. विष्णू मंदिर सु. २ मीटर उंचीच्या जोत्यावर उभे असून सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची सर्वसाधारण रचना आहे.

विष्णू, महादेव व गणेश मंदिरे, सांगवी सांडस 

सभामंडपात कूर्मशिल्प असून गर्भगृहाच्या बाजूला काही देवळ्या व देवकोष्ठे दिसतात. 

गणेश शिल्प 

गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर गणेश शिल्प आहे. गर्भगृहात एका उंचवट्यावर विष्णूचे सुंदर शिल्प आहे. विष्णूच्या उजवीकडील खालच्या हातात गदा, वरच्या हातात पद्म, तर डावीकडील बाजूला असणाऱ्या वरच्या हातात शंख तर खालच्या हातात चक्र आहे. 

विष्णू शिल्प, सांगवी-सांडस

गर्भगृहाचे वितान घुमटाकार आहे. मंदिरासमोर अलीकडच्या काळात नवीन मंडप बांधला आहे. विष्णू मंदिराच्या उजवीकडे गणेशाचे मंदिर आहे. सभामंडपात जाण्यासाठी तीन पायऱ्या आहेत. सभामंडपाला तीन कमानी असून मध्यभागी कूर्मशिल्प आहे. गर्भगृह व प्रवेशद्वारावर गणेश शिल्प आहेत.

विष्णू मंदिराच्या गर्भगृहाचे वितान


गणेश मंदिर

विष्णू मंदिरासमोरील घाट व भीमा नदी

विष्णू मंदिराच्या डावीकडे गणपती मंदिरासारखे हुबेहूब दिसणारे शिव मंदिर आहे. या मंदिराच्या गर्भगृहात शिवलिंग आहे. दोन्ही मंदिरांच्या गर्भगृहातील विताने एकसारखीच आहेत. या तिन्ही मंदिरांवरील शिखरांचा जीर्णोद्धार केला गेला आहे.
शिव मंदिर

या मंदिरांसमोर एक घाट असून येथून भिमा नदीचे विस्तीर्ण पात्र खूपच आकर्षक दिसते. 


श्रीनाथ मंदिर 
सांगवी गावाच्या दुसऱ्या बाजूला श्रीनाथाचे मंदिर (१८.६१९६१५, ७४.१७१८४६) आहे. हे मंदिर जुने होते, परंतु अलीकडेच ते पाडून तेथे नवीन मंदिर बांधण्यात आले आहे. मूळ मंदिरातील चार ओळींचा एक मराठी शिलालेख येथील नवीन पायरीत लावला आहे. सदर लेख खोदीव स्वरूपाचा आहे. मंदिराच्या मागे एक खंडित नंदी व एक वीरगळ ठेवला आहे.
श्रीनाथाचे नवीन मंदिर

सांगवी सांडस येथील मंदिरांच्या रचनेवरून येथील सर्व मंदिरे उत्तर-मराठा कालखंडात म्हणजेच १८-१९ व्या शतकात बांधली असावीत. 

पहिला शिलालेख 
नाथ मंदिराच्या पायरीवरील लेख सदर लेख सांगवी गावातील नाथ मंदिराच्या पायरीला लावला आहे. हा लेख मराठी भाषेत असून देवनागरी लिपीत आहे. 
शिलालेख: स्वच्छ करण्यापूर्वी  

शिलालेख: स्वच्छ केल्यानंतर

शिलालेखाचे वाचन: 

१. II श्री नाथाचे दे. (देऊळ) भी : 
२. II श. (शके) १७९० सा. लक्षुम 
३. II ण व हानवंता क 
४. II पी. धा. का. ब. दे. 

श्रीनाथ मंदिराच्या पायऱ्यावर लावलेला शिलालेख, सांगवी सांडस

इंग्रजी वर्ष: इ.स. १८६८ 
व्यक्ती नाम: लक्षुमण (लक्ष्मण), हानवंता (हानुमंत) 

शिलालेखाचा संक्षिप्त अर्थ: शके १७९० म्हणजेच इ.स. १८६८ साली लक्ष्मण व हानुमंत यांनी श्री नाथाचे मंदिर बांधले. 

शिलालेखाचे महत्त्व: शिलालेखात संक्षिप्त शब्दांचा भरपूर उपयोग केला आहे. संभवतः लक्ष्मण व हानुमंत हे वडार (पाथरवट) समाजातील व्यक्ती असाव्यात. लेखात उपयोगात आणलेले शब्द संक्षेप हे या लेखाचे वेगळेपण आहे. यातील काही शब्द संक्षेपाची ओळख पटत नाही. या कोरीव लेखाच्या माध्यमातून श्रीनाथाचे मंदिर बांधल्याची स्मृती जपलेली आहे. 


दुसरा लेख 
सदर लेख श्री नाथ मंदिरापासून जवळच असणाऱ्या श्री. संदीप पोपट लोले यांच्या वाड्याच्या भिंतीवर कोरला आहे. हा लेख २५ सेमी उंच व ७२ सेमी रुंद अशा एका शिळेवर आहे. हा लेख मराठी भाषेत व देवनागरी लिपीत आहे.

दुसरा लेख, सांगवी सांडस

शिलालेखाचे वाचन: 

१. म्हा मादु व रामा व पिला वडा श्री [र] 
२. वी १८१८ 

अर्थ: मादु, रामा व पिला या वडार (पाथरवट) समाजातील व्यक्तींनी शके किंवा इ.स. १८१८ साली सदर वाड्याचे बांधकाम केले. 

इंग्रजी तारीख: इ.स. १८९६ (जर लेखातील वर्ष हे शक असेल तर) 

व्यक्ती नाम: मादु वडार, रामा वडार, व पिला वडार 


तिसरा लेख 
हा लेख ही श्री. संदीप पोपट लोले यांच्या वाड्यात आहे. हा लेख मराठीत असून देवनागरी लिपीत आहे. लेख कोरलेल्या शिळेची उंची सु. ९ सेमी असून रुंदी ७० सेमी इतकी आहे. सदर लेखात वाडा बांधणाऱ्या रामा देव जी वडार यांचे नाव आलेले आहे. वाडा बांधण्याची स्मृती जपणे हा या मागील उद्देश्य दिसतो. 

तिसरा लेख, सांगवी सांडस

शिलालेखाचे वाचन: 

बा I (र) का राम देव जी वडारी 

एकंदरीत, वरील लेख तितकेशे महत्त्वाचे नाहीत. परंतु तत्त्व हेरीटेज फौन्डेशन आयोजित पुणे जिल्ह्यातील मंदिरांच्या सर्वेक्षणात सदर लेख आढळून आल्याने त्याची कुठेतरी नोंद व्हावी या उद्देश्याने त्यावरील लिखाण काम केलेले आहे. वरील शिलालेखांतून वडार समाजाचे मंदिर व बांधकाम क्षेत्रातील त्यांचे योगदान दिसून येते.

सांगवी गावातील वाडा

सांगवी गावातील बुजलेली बारव

हनुमान मंदिर, सांगवी सांडस

याशिवाय गाव परिसरात एक बुजलेली मारुती मंदिर, बारव, वाडे व घाट दिसून येतात.