बुधवार, २४ जून, २०२०

पूर्वमध्ययुगीन तेर

गणेश प्रतिमा, काळेश्वर मंदिर, तेर


इंडो-रोमन व्यापाराला उतरती कळा लागल्यानंतर अनेक व्यापारिक केंद्रे ओसाड पडू लागली, परंतु ती पूर्णपणे लयास गेलेली नव्हती. सातवाहन काळातील मराठवाडयातील तेर हे एक असेच ठिकाण, जेथे सांस्कृतिक, व्यापारिक व राजकीय घडामोडी नंतरच्या काळातही अव्याहतपणे सुरु होत्या. साधारणतः सहाव्या शतकापासून ते बाराव्या-तेराव्या शतकापर्यंत तेर परिसरात या घडामोडीविषयींचे अनेक पुरावे उपलब्ध पुरावशेषांतून दिसून येतात. यामध्ये प्रामुख्याने मंदिरे, शिल्पे, शिलालेख, वीरगळ इ. पुरावशेषांचा समावेश करता येवू शकतो. इ. सनाच्या चौथ्या शतकापासून पुढे सुमारे २०० वर्षे स्थानिक पातळीवर व्यापार सुरु असला पाहिजे. कारण याची परिणती म्हणून या भागात सुमारे सहाव्या शतकाच्या सुरुवातीला धाराशिव येथील जैन व चांभार लेणी खोदण्यात आलेली दिसतात. तेर येथील उत्खननात चौथ्या व पाचव्या कालखंडातील थर सु. वाकाटाक-चालुक्य ते पुढे मध्ययुगापर्यंतच्या काळाचा निदर्शक आहे. यावरून हे स्पष्ट होते की या कालखंडात येथे समृद्ध मानवी वस्ती अस्तित्त्वात होती.

तेर गावाच्या मधोमध स्थित त्रिविक्रम मंदिराविषयी अनेक विद्वानांनी आपापली मते मांडलेली आहेत. शां. भा. देव यांच्या मते ही वास्तू मुळात बौद्ध चैत्यगृहाची असून मागाहून येथे त्रिविक्रमाची मूर्ती स्थापित करून सभामंडप वगैरे बांधण्यात आले असावेत. या वास्तूच्या गर्भगृहाचा पृष्ठभाग अर्धवर्तुळाकृती असून त्यावरील छप्पर गजपृष्ठाकृती आकाराचे आहे. डॉ. माटे यांच्या मते अशा प्रकारची वास्तू पल्लव शैलीशी मिळती-जुळती असून ती हिंदू आहे. त्रिविक्रम मंदिरातील त्रिविक्रमाची मूर्ती खूपच आकर्षक असून मूर्तिकलेतील एक उत्तम उदाहरण आहे.

त्रिविक्रम मंदिर, तेर

तेर येथील उत्तरेश्वराचे मंदिर द्राविडी शैलीतील असून पूर्णपणे विटांचे आहे. शां. भा. देव यांच्या मते हे मंदिर सातव्या शतकातील असावे. या मंदिराची चौकट लाकडी असून कित्येक वर्षांनंतर आजही टिकून आहे. चौकटीच्या ललाटबिंबावर देव-देवतांची सुंदर शिल्पे कोरण्यात आलेली आहेत. या मंदिराचे वैशिष्ट्य असे की याच्या बांधणीत साच्यात बनविलेल्या अलंकृत विटांचा वापर केलेला आहे. 

उत्तरेश्वर मंदिर, तेर


उत्तरेश्वर मंदिरावरील कोरीव काम, तेर

संत गोरोबा काकांच्या समाधी मंदिराशेजारील काळेश्वर मंदिर, चालुक्य काळातले मानले जाते. हे मंदिर विटांनी निर्मित असून काळ आणि शैली उत्तरेश्वर मंदिराशी मिळती-जुळती आहे.

काळेश्वर मंदिर परिसर, तेर

या शिवाय तेर येथे सिद्धेश्वर, नृसिंह मंदिर, त्रिपुरांतकेश्वर, अमरेश्वर, रामेश्वर, निलकंठेश्वर मंदिर इ. मंदिरे आहेत. सिद्धेश्वराचे मंदिर त्याच्या शैलीवरून यादवकालीन म्हणजेच १३व्या शतकातील वाटते. सध्या या मंदिराचा सभामंडप, गर्भगृह व स्तंभ अस्तित्त्वात आहेत. स्तंभशिर्षांवरील कोरलेले भारवाहक आकर्षक आहेत. नृसिंहाचे मंदिर गावाबाहेर असून त्याची बरीच पडझड झालेली आहे. तेरणा नदी पत्रात दगडांचा वापर करून बांधलेले त्रिपुरांतकेश्वर मंदिर होते. अमरेश्वराचे मूळ मंदिर सध्या अस्तित्त्वात नसले तरी सध्या अस्तित्त्वात असलेले  प्राचीन शिवलिंग मूळ ठिकाणी दिसते. याशिवाय काळेश्वर मंदिर परिसरात अनेक लहान-मोठी तुलनेने जुनी शिवलिंगे आढळून येतात. ही सर्व शिवलिंगे कधीकाळी तेर परिसरात अस्तित्त्वात असलेल्या मंदिरांची आठवण करून देतात.

सिद्धेश्वर मंदिराचा सभामंडप, तेर

तेर येथील व्यक्तींना पूर्वमध्यकाळात किती महत्त्व प्राप्त होते, हे इ. स. ६१२ सालातील पश्चिमी चालुक्यांच्या एका अभिलेखावरून स्पष्ट होते. या शिलालेखात तेर येथील ‘जेष्ठशर्मन’ या प्रसिद्ध व्यक्तीचा उल्लेख आलेला आहे. राष्ट्रकुटांच्या इ. स. ६९३ च्या एका ताम्रपटातही तगरनिवासी ‘हरगण द्विवेदी’ यांना जमिनी दान दिल्याचा उल्लेख आहे. तेर येथील अकराव्या ते सोळाव्या शतकापर्यंतचे चार लेख ग. ह. खरे यांनी संपादित केले आहेत. यातील अकराव्या शतकातील कानडी भाषेतील शिलालेख त्रिविक्रम मंदिरात आहे. यात कलचुरी घराण्यातील महामंडलेश्वर ‘जोगमरस’ तसेच ‘वारीमल्लोज’ या शिल्पीचा उल्लेख आलेला आहे. बाराव्या शतकातील मराठी शिलालेख मारुतीच्या देवळाच्या पाराजवळचा असून यात उद्यापनाच्या निमित्ताने दिलेल्या दानाचा उल्लेख आहे. जिन बसदी येथे पार्श्वनाथाच्या सिंहासनावर चौदाव्या शतकातील शिलालेखात वार्धमानाच्या देवालयाचा जीर्णोद्धार केल्याचा तसेच पादुकादानाचा उल्लेख आहे.   

याशिवाय, तेर येथून पूर्वमध्ययुगीन कालखंडातील भरपूर मूर्ती-शिल्पे मिळालेली आहेत. यामध्ये विष्णू-नारायण, कार्तिकेय, भैरव व इतर देवी-देवतांची शिल्पे महत्त्वपूर्ण आहेत. तेर येथून प्राप्त झालेली बहुतेक शिल्पे येथील श्री. रामलिंगप्पा लामतुरे संग्रहालयात सुरक्षित ठेवण्यात आलेली आहेत. या संग्रहालयात तसेच काळेश्वर मंदिरात काही वीरगळ दिसून येतात. काळेश्वर मंदिरातील वीरगळांचा कालखंड प्राचीन असून त्यांच्या शैलीवरून ती यादवकाळाच्याही पूर्वीची वाटतात.

रगळ, तेर


शिलाहार राजे आपले मूळ तेरचे असल्याचे त्यांच्या शिलालेखात सांगतात. ते त्यांच्या नावासमोर  ‘तगर’ नावाशी संबंधित असलेल्या बिरुदावल्या लावीत. इ. स. ९९७ च्या शिलाहार घराण्यातील अपराजिताच्या शिलालेखात ‘तगरपुरपरमेश्वर’ असे बिरूद त्याने स्वतःला लावून घेतलेले आहे. इ. स. १०५८ मधील आणखी एका शिलालेखात शिलाहार घराण्यातील कराड शाखेच्या मारसिंहाने स्वतःला ‘तगरपुरवराधीश्वर’ हे बिरूद लावलेले आहे. याच लेखात या राजघराण्यातील ‘जतिंग’ या दुसऱ्या राजाचा उल्लेख ‘तगरनगरभूपालक’ असा केलेला आहे. ह्या भूभागावर शिलाहारांचा प्रत्यक्ष अंमल कधीच नसल्यामुळे ‘तगर’ हे फक्त त्यांचे मूळचे गाव असावे, असे दिसते. आजही उस्मानाबादजवळील पळसवाडी गावात ‘शेलार’ आडनाव असणारी कुटुंबे राहतात.  

धाराशिव आणि तेरचा निकटचा संबंध असावा असे कर्कंडचरिउ व बृहत्कथाकोश या दोन ग्रंथांमधील उल्लेखांवरून समजते. बृहत्कथाकोशात धाराशिव येथील जिन मंदिरातील मूर्तीचा उल्लेख आलेला आहे. ‘तेरापूर’ या गावाच्या दक्षिणेस धाराशिवच्या जंगलात या मूर्ती सापडल्याची माहिती यात दिली आहे. या ग्रंथाचा नायक ‘कर्कंड’ हा तेरापुर येथील एका व्यापाऱ्याचा मुलगा होता, असे सांगितले आहे. यावरून तेर येथील व्यापार अगदी दहाव्या शतकापर्यंत अस्तित्त्वात असावा असे दिसते. अकराव्या शतकातील कर्कंडचरिउ या ग्रंथातही अशा आशयाची माहिती दिलेली आहे.

तेराव्या शतकातील संतकवी गोरा कुंभार यांचे समाधिस्थळ तेरणा नदीकाठी असलेल्या काळेश्वर मंदिराजवळ आहे. संत गोरा कुंभार हे वारकरी संप्रदायात जेष्ठ संत समजले जात. यामुळे वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनेही तेरचे महत्त्व अधोरेखित होते.

बाराव्या-तेराव्या शतकात तेर येथे एक जैन देवालय (बसदी) बांधण्यात आले, ते वर्धमान महाविराचे असून त्याचा जीर्णोद्धार शके १३१३ मध्ये केला, असे येथील एका शिलालेखावरून दिसून येते. तसेच कर्कंडचरिउ व बृहत्कथाकोश या ग्रंथांतील आशयावरून १०व्या शतकापुर्वीच जैन मत तेरमध्ये प्रभावी होते, असे दिसून येते.

जैन मंदिरातील जैन प्रतिमा, तेर

एकंदरीत, पूर्वमध्ययुगीन काळातही तेरच्या विकासाची घौडदौड सुरूच होती. येथील व्यक्तींना तसेच शिल्पींना इतरत्र मान-सन्मान मिळत होता. शिलाहार घराण्यातील राजे तेर निवासी असल्याचा स्वतःचा उल्लेख अभिमानाने करीत असत. सातवाहन काळानंतर बौद्ध धर्माचा प्रभाव ओसरल्यावर हे एक वैष्णव केंद्र म्हणून पुढे आल्याचे येथील पुरावशेषांवरून दिसून येते. पुढे तेराव्या शतकात तेरचा संबंध वारकरी संप्रदायाशी आल्याचा आपणास दिसून येतो. 

संत गोरा कुंभार मंदिराच्या भिंतीत लावलेली विष्णू प्रतिमा, तेर

जैन मताचा प्रभाव येथे संभवतः प्राचीन काळापासूनच असला पाहिजे, परंतु या संबंधीचे स्पष्ट पुरावे १०व्या शतकापासून काही ग्रंथांमधून मिळतात. पूर्वमध्ययुगात तेरची ओळख सातवाहन काळाइतकी मोठी नसली तरी, ती क्षेत्रीय पातळीवर अजूनही अबाधित राहिलेली दिसून येते.

सु. सातशे वर्षांच्या या कालखंडात बऱ्याच राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक घडामोडी येथे घडून आल्याचे निदर्शनास येते. पूर्वमध्ययुगात राष्ट्रकूटांच्या राजधान्या ‘लत्तालूर’ (लातूर) व ‘मान्यखेट’, कलचुरींची राजधानी ‘मंगळवेढा’, चालुक्यांची राजधानी ‘कल्याणी’, यादवांची राजधानी ‘देवगिरी’, ‘अंबाजोगाई’ व तेरचे भौगोलिक स्थान लक्षात घेता, तेर आणि या राजवंशांचा घनिष्ट संबंध आलेला असावा. तेर परिसरातील सुपीक जमीन, तेरणेचे मुबलक पाणी, समृद्ध व्यापारी परंपरा, येथील समृद्ध घराणी व व्यापारी यामुळे तेर कित्येक वर्षे आर्थिकदृष्ट्या समृद्ध असे ठिकाण म्हणून नावलौकिक मिळवून राहिले असावे. धाराशिव व खरोसा येथील लेणी खोदण्यामागील प्रेरणेत तेरच्या परंपरागत वैभवाचा अप्रत्यक्ष प्रभाव असायला पाहिजे. खऱ्या अर्थाने तेरमुळेच दक्षिण मराठवाडयातील या प्रदेशाला प्राचीन व पूर्वमध्ययुगात खरी ओळख प्राप्त झाली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.  

 

संदर्भ ग्रंथ

खरे, ग. ह., ‘तेर येथील चार शिलालेख’, भारत इतिहास संशोधक मंडळ, वार्षिक, वर्ष-१४, अंक ४. १९३४. पुणे.

दीक्षित, मो. ग., ‘तेर वस्तुसंग्रहालयातील पुरातन वस्तूंचा परिचय’, भारतीय इतिहास आणि संस्कृती, वर्ष ९, १९७२. मुंबई मराठी संग्रहालय, मुंबई.

देव, शां. भा. ‘तेर’, पुरातत्त्व-शोध-निबंधमाला, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये विभाग, १९८७. मुंबई.

Mate, M.S. 1957, ‘Trivikram Temple at Ter’ Bulletin of the Deccan College Post-Graduate and Research Institute, Poona,Vol. XVIII, pp.1-4. 

 

शनिवार, २० जून, २०२०

पुणे परिसरातील योग-साधना व संबंधित शिल्पे

Travels and tourism, History and culture, Archaeology, Anthropology, Folk culture, Yoga, Hindi literature, Environment, Geography, Manuscripts, Iconography etc.

आधुनिक जीवनशैलीमुळे आरोग्यसंबंधीच्या निर्माण झालेल्या अनेक समस्या तसेच दिवसेंदिवस वाढत चाललेला ताण-तणाव, यांवरती उपाय म्हणून योगसाधनेकडे जग मोठया आशेने पाहत आहे. दैनंदिन जीवनात आरोग्य विषयीचे महत्त्व आपल्या पूर्वजांनी फार पूर्वीपासूनच ओळखले होते. यासाठी त्यांनी योगसाधनेला आपलेसे केले. अनेक ऋषी-मुनींनी योगविद्येच्या बळावर आपले व इतरांचे जीवन आरोग्यदायी बनविण्याचा प्रयत्न केला. जागो-जागी असणारे सांप्रदायिक मठ तसेच गुहा-कंदरांमध्ये ही साधना चालत असे. वरचेवर यात नवनवीन प्रयोग झाल्याने ही विद्या भरभराटीस आली. कित्येक प्राचीन मंदिरांवरती शिल्पकलेच्या रुपात आपल्याला याचे पुरावे मिळतात.


अर्ध-मत्स्येंद्रासन, ब्रह्मनाथ मंदिर, पारुंडे
आपला हा प्राचीन वारसा अनेक ग्रंथ व मौखिक परंपरेने तर जपला गेला आहेच, परंतु हा एवढया पुरताच मर्यादित न राहता शिल्पकलेच्या माध्यमातूनही जोपासण्याचा प्रयत्न झाला. योगविषयीची अनेक आसने, मुद्रा, प्राणायामांचे प्रकार शिल्पबद्ध केले गेले. पुणे परिसरात व जिल्ह्यात इतरत्र अशा प्रकारची शिल्पे व अवशेष आपल्याला पहावयास मिळतात.
आज पुणे शहरातील ‘अय्यंगार योग संस्था’ तसेच लोणावळ्यातील ‘कैवल्यधाम’ व ‘लोणावळा योग संस्था’ योगविद्येच्या प्रचार व प्रसारासाठी कार्यरत असल्या तरी, ही परंपरा पुण्यासाठी नवीन नाही. इसवीसन १७५४ ते १७७० या काळात सोमवार पेठेत बांधल्या गेलेल्या त्रिशुंड गणपती मंदिर व मठात योगविद्येची साधना केली जात असे. साधकांना योग्य प्रकारे साधना करता यावी म्हणून विशिष्ट खोल्यांची रचनाही येथे केली गेली होती. येथे ‘धुम्रपान’ नावाची एक विशिष्ट साधना होत असे. त्यामध्ये हठयोगाचे साधक स्वतःला छताला उलटे टांगून घेत व खाली निखाऱ्यामध्ये काही औषधी वनस्पती टाकल्या जात व त्यापासून निघालेला धूर ते नाकाद्वारे घेत असत. यामध्ये संभवतः दशनामी गोसावी पंथातील साधक हठयोगाची साधना करीत. येथे काही योगसाधकांच्या समाध्याही आहेत. अशा या योग-स्मारकाचे संवर्धन करून त्याचा विकास करणे अगत्याचे आहे.
पुण्यापासून साधारणतः ५४ किमी अंतरावर पिंपरी-दुमाला नावाचे गाव आहे. येथील सोमेश्वर मंदिरावर कुंडलिनी योग विषयीचे महत्त्व सांगणारे दुर्मिळ शिल्प आहे. सुमारे सातशे वर्षांपूर्वी हे मंदिर बांधले गेले. या मंदिराच्या प्रदक्षिणामार्गावर संभवतः आदिनाथांची एक अतिशय दुर्मिळ प्रतिमा आहे. आदिनाथ अर्थात शिव. यामध्ये ते समाधिस्थ योगीच्या रुपात साकारले गेले असून ते पद्मासनात बसले आहेत. त्यांचा उजवा हात ‘सूची’ मुद्रेत आहे. सर्वात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे शिल्पकाराने त्यांच्या डोक्यावर अर्धवट उमललेले कमळ दाखविले आहे. हे कमळ योग साधनेत खूप महत्त्वाचे प्रतिक मानले जाते. मानवी शरीरात कुंडलिनीरूपाने ‘शक्ती’ सुप्त अवस्थेत असते तसेच मस्तकातील सहस्रारांत शिवाचा निवास असतो. कुंडलिनीचा प्रवास मेरुदंडाजवळील मूलाधार चक्रापासून सुरु होऊन त्यानंतर स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्धाख्य चक्र आणि आज्ञा चक्र अशा सहा चक्रांना ओलांडून सहस्रारांत संपतो. योगी ह्या कुंडलिनीरुपी शक्तीला जागृत करून सुषुम्ना नाडीच्या माध्यमातून शक्ती व शिवाचे मिलन सहस्रारांत घडवून आणतो आणि हे सहस्रार रुपी कमळ उमलले जाते अर्थात योग्यास परमानंदमय समाधी प्राप्त होते. असे हे अनन्यसाधारण शिल्प येथील मंदिरावर कोरण्यात आले आहे. पुणे परिसरात योगसाधनेचा प्रचार-प्रसार किती मोठ्या प्रमाणात झाला होता याचे हे उत्तम उदाहरणच होय. सोमेश्वर मंदिरांवरील या शिल्पांमध्ये नाथ संप्रदायातील इतर हठयोगीही दाखविले आहेत. यामध्ये मत्स्येंद्रनाथ व गोरक्षनाथांची शिल्पे या भागात दुर्मिळच म्हणावी लागतील. योगसाधनेच्या उज्ज्वल परंपरेमध्ये पिंपरी-दुमाला येथील मंदिरावरील हठयोगाच्या महान गुरूंची शिल्पे राष्ट्रीय संपदा ठरावीत अशी आहेत.

कुंडलिनी योग संबंधीचे शिल्प, पिंपरी-दुमाला
कुंडलिनी योगाचे ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथात भरपूर विवेचन केले आहे. आळंदी येथे इंद्रायणी काठी तर ८४ सिद्धांचा मेळा भरत असे. या सिद्धांपैकी काही सिद्ध हे हठयोगी होते. ज्ञानेश्वरांच्या परंपरेतील नाथ-योग्यांच्या समाध्या आजही ज्ञानेश्वर मंदिर परिसरात पहावयास मिळतात.
पुण्यापासून साधारणतः ५४ किमी अंतरावर प्रसिद्ध असणाऱ्या प्राचिन भुलेश्वर मंदिरातही सिद्धांची बरीच शिल्पे आहेत. त्यांना पद्मासन, सिद्धासन यांसारखी विभिन्न आसने व मुद्रांमध्ये दर्शविले आहे. किंबहुना येथील एक सुंदर शिल्प विशिष्ट अशा द्विपादशिरासनात असून साधकाने यात आपल्या पाठीमागे दोन्ही पाय एकमेकांत अडकविले आहेत. 
द्विपादशिरासन/पाशिनी मुद्रा, भुलेश्वर मंदिर
जुन्नरपासून साधारणतः १० किमी अंतरावरील पारुंडे गावातील ब्रह्मनाथ मंदिराच्या खांबांवरती विविध ध्यान-धारणा व आसनातील अनेक शिल्पे कोरण्यात आली आहेत. उर्ध्व-धनुरासन, गरुडासन, नौकासन, प्रसारित-पादोत्तानासन, गोमुखासन, पाद-पश्चिमोत्तानासन, अनंतासन, अर्ध-मत्स्येन्द्रासन, क्रौंचासन अशा किती तरी आसनांचे प्रकार येथे कोरले गेले आहेत.
पाद-पश्चिमोत्तानासन, ब्रह्मनाथ मंदिर, पारुंडे
येथूनच पुढे हरिश्चंद्रगडावर प्रसिद्ध योगी चांगदेव यांनी ‘तत्त्वसार’ नावाचा ग्रंथ लिहिला होता. त्यामुळे हा परिसर एकेकाळी योग साधकांच्या गर्दीने फुलून गेलेला असावा असे दिसते. अशा या दर्जेदार वारशामुळे सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रांबरोबरच योगसाधनेच्या परंपरेतही पुणे परिसर व जिल्ह्याचे महत्त्व ठळकपणे दिसून येते.
योग विद्येचे जागतिक महत्त्व ओळखून या स्थळांचे व्यवस्थितरित्या संगोपन व संवर्धन होणे गरजेचे आहे. योगसाधनेच्या परंपरेत आपणासही असा प्राचीन वारसा लाभला आहे, याचा अभिमान सर्वांनी बाळगायला हवा. या अवशेषांचे अस्तित्त्व टिकून राहणे म्हणजे आपले व आपल्या पूर्वजांचे अस्तित्त्व टिकून राहण्यासारखे आहे. हा अनमोल ठेवा नाहिसा होण्याअगोदर त्याची माहिती सर्वदूर पोहोचवून त्याचे महत्त्व जगासमोर मांडणे गरजेचे आहे. संपूर्ण विश्व योगसाधनेला जवळ करीत असताना आपणही या निमित्ताने आपल्या पूर्वजांप्रमाणे योगविद्येला अंगीकारून आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनवायला हवे. आपल्या भारतीय योगपरंपरेचे हे प्राचीन दुर्मिळ पुरावे निश्चितच संपूर्ण जगासाठी मार्गदर्शक व प्रेरक ठरतील व आपल्या पूर्वजांचे महान कार्य शिल्परूपाने बोलू लागतील.